शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियात मोठे बदलाची संभवता

0

नवी दिल्ली:  विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 203 धावांनी दणदणीत विजय मिळवून 5 सामन्यांच्या या मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.

अनुभवी सलामीवीर मुरली विजय याला पहिल्या दोन कसोटीतील खराब खेळानंतर संघातून बाहेर करण्यात आले. तर चायनामन कुलदीप यादव याच्या जागी अतिरिक्त फलंदाजाला स्थान मिळाले आहे. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर तिसऱ्या फिरकीपटूची गरज नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईचा युवा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशचा मधल्या फळीतला बॅट्समन हनुमा विहारीची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. ओपनर मुरली विजय आणि स्पिनर कुलदीप यादवला डच्चू देण्यात आला आहे.

हनुमा विहारी हा अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या सामन्यात हनुमाने ५४ धावांची खेळी केली. त्याशिवाय याच संघाविरुद्ध झालेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात त्याने १४८ धावांची जोरदार खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, तो ऑफस्पिनर गोलंदाजही आहे.