धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे गावाच्या शिवारातील शेतात अवैधरीत्या दारूचा कारखान्यावर धाड टाकून सुमारे दिड लाखांचा मद्यसाठ्यासह दोन संशयीतांना अटक करण्यात आली. रविवार, 10 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आल्यानंतर अवैधरीत्या मद्याची तस्करी करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पवन सुदाम कोळी (19, मु.पो. शेवाळे, मेन गल्ली, ता.शिंदखेडा) व योगेंद्र किशोर सोनवणे (24, रा.प्लॉट नं. 36, घुगे नगर देवपूर, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे गावाच्या शिवारातील शेतात पवन सुदाम कोळी हा त्याच्या साथीदारासह अवैधरीत्या दारू बनविण्याचा कारखाना चालवित असल्याबाबत खात्रीशीर माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर रविवार, 10 रोजी पथकाने छापा टाकून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
दिड लाखांचा मद्यसाठा जप्त
पथकाने शेतातून 80 हजार 640 रुपये किंमतीच्या देशी दारु टँगो पंचच्या भरलेल्या एक हजार 344 बाटल्या, तीन हजार रुपये किंमतीच्या देशी दारु टँगो पंचच्या रीकाम्या एक हजार बाटल्या, 15 हजार रुपये कॅप सिलिंग मशीन, दोन तीनशे रुपये किंमतीचे पाच निळ्या रंगाचे प्लॅस्टिक ड्रम व त्यात दोन हजार रुपये किंमतीचे रसायन, अल्कोहोल मिटर, दारु बनविण्यासाठीचा सेंट, बुच, टाकी, ट्रे, गाळणी, नळ्या व टेक्सो, दोन मोबाईल, होंन्डा शाईन मोटारसायकल असा एकूण एक लाख 36 हजार 660 रुपये किंमतीचा व वर्णनाचा मुद्देमाल आरोपीतांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोघा आरोपींविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी योगेंद्र सोनवणेविरोधात यापूर्वी देवपूर पोलिस ठाण्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गुन्हा दाखल आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, धनंजय दीपचंद मोरे, हवालदार संजय पाटील, प्रकाश सोनार, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील आदींनी केली.