मुक्ताईनगर- तालुक्यातील कर्की फाट्यावरील ढाब्यावर शेवचा पुरवठा न केल्याचा राग येवून तिघांनी एकाला कोयत्याने मारहाण केल्याची घटना 22 मार्च रोजी दुपारीचार वाजेच्या सुमारास धाबेपिंप्री गावात घडली. या प्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कर्की फाट्याजवळील सावरीया ढाब्यावर लोहारखेडा येथील रमेश रामराव पाटील (40) हे शेवचा पुरवठा करतात मात्र त्यांनी ढाब्यावर शेवचा पुरवठा न केल्याचा राग येवुन प्रदीप रामराव माळी (रा.लोहारखेडा), मोहन गणेश भंडारे व मनोहर गणेश भंडारे (रा.पिंप्रीनांदु, ता.मुक्ताईनगर) या तिघांनी लोखंडी कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी रमेश पाटील यांना उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले. या प्रकरणी सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरुन पोलिसात तिघा आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळंके करीत आहेत.