विद्या प्राधिकरणातर्फे परीक्षापद्धती, मूल्यमापन चाचण्या यांचे प्रशिक्षण
पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (विद्या प्राधिकरण) राज्यातील पाच लाख शिक्षकांनी वर्षभरात विविध विषयांचे प्रशिक्षण घेतले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी या प्रशिक्षणाचा शिक्षकांना नक्कीच फायदा होऊ लागला आहे. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता यंदा सर्वाधिक 5 लाख 7 हजार 440 शिक्षकांनी प्रशिक्षण दिल्याचे सांगण्यात आले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शिक्षकांनाही झाला आहे.
राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात शिक्षकांच्या प्रशिक्षणाचाही समावेश केला जातो. राज्यात 1 लाख 6 हजार 527 प्राथमिक शाळा तर 26 हजार 879 माध्यमिक शाळा आहेत. या सर्वच शाळातील शिक्षकांना प्रामुख्याने भाषा, विज्ञान, गणित, संगणक, परीक्षापद्धती, मूल्यमापन चाचण्या, व्यक्तिमत्त्व विकास याविषयांचे प्रशिक्षण देण्यात येते.
प्रशिक्षणाचे सर्व कामकाज हे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडूनच राबविण्यात येत असते. शिक्षकांना कोणत्या विषयांचे प्रशिक्षण घ्यायचे आहे याबाबतची माहिती अर्जाच्या स्वरुपात शिक्षकांकडून मागविण्यात येते. त्यानंतर विषयानुसार टप्प्या टप्प्याने वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. विविध विषयांच्या तज्ञांकडून शिक्षकांना प्रशिक्षणाचे धडे देण्यात येतात. प्रशिक्षणाला येणार्या शिक्षकांची जेवण्याची व राहण्याची व्यवस्थाही प्रशिक्षणाच्या ठिकाणीच करण्यात येत असते. दरवर्षी प्रशिक्षण घेणार्या शिक्षकांची संख्या ही वाढतच चालली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
वर्ष-प्रशिक्षण मिळालेले शिक्षक
2015-16 1 लाख 82,428
2016-17 3 लाख 37,348
2017-18 5 लाख 7,440