शॉपिंग बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी आयुक्तांचे चौकशीचे आदेश

0

धुळे। शहरातील सिटी सर्व्हे नं.1618 व 1618 अ या मनपा शाळा क्र.21 आणि 45 च्या जागेवर बीओटी तत्वावर बांधकाम सुरु असलेल्या शॉपिंगबाबत माजी नगरसेवक कैलास हजारे यांनी तक्रार केली असून आयुक्त संगिता धायगुडे यांनी द्विसदस्यीय समिती नेमून या तक्रारीची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. मनपा शाळा क्र.21 व 45 या बेकायदेशीररित्या बंद करुन तेथे बीओटी तत्वावर शॉपिंगचे बांधकाम केले जात आहे.

या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने मनपाचे नुकसान झाले आहे, अशी तक्रार माजी नगरसेवक कैलास हजारे यांनी आयुक्तांकडे केली होती. हजारे यांनी केलेले आरोप गंभीर असल्याने आयुक्त संगिता धायगुडे यांनी उपायुक्तांसह मुख्य लेखापरिक्षक यांची द्विसदस्यीय समिती नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीने महिनाभरात हजारे यांच्या प्रत्येक मुद्याच्या अनुषंगाने चौकशी करावी, शाळेच्या जागेवर बीओटी तत्वावरील बांधकाम करतांना नियमांचे उल्लंघन झाले आहे काय? तसेच यातून मनपाचे आर्थिक नुकसान झाले आहे का? याबाबत सुस्पष्ट व वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने देण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय या चौकशीकामी मनपा तांत्रिक समितीचे हिरालाल ओसवाल यांचीही मदत घेण्याचे या आदेशात नमूद केले आहे.