भुसावळ शहरातील वर्दळीच्या जामनेर रोडवरील दुर्घटना ; नगरसेवक पिंटू कोठारींसह नितीन धांडे यांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ; सुदैवाने टळली जीवीतहानी
भुसावळ- शहरातील वर्दळीच्या जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शॉपसमोरील रहिवासी नाना पाटील यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे 50 हजारांवर रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात मात्र आगीची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
बोर्डात शॉर्टसर्किटने घराला आग
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी नाना पाटील हे पत्नी व मुलांसह जामनेर रस्त्यावरील साईजीवन सुपरशॉप समोरील दुमजली घरात राहतात. बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास वीज दाब वाढल्याने बोर्डात शॉर्टसर्किट झाल्याने आगीची ठिणगी खाली असलेल्या वॉशिंग मशीनसोबतच गादीवर पडल्याने आगीचा भडका उडाला. पाहता-पाहता अंथरूणासह कपड्यांनी पेट घेतल्याने घरातून आगीचे मोठ-मोठे लोळ बाहेर पडू लागल्याने कुटुंबियांची भंबेरी उडाली. पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तर साईसेवक व नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी जीवाची पर्वा न करता आगीत उडी घेत संसारोपयोगी साहित्य बाजूला करून शर्थीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पालिका अग्निशमन दलाचे वाहन आल्यानंतर अवघ्या काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने अप्रिय घटना टळली मात्र सुमारे 50 हजारांचे संसारोपयोगी साहित्यासह नुकसान झाले.
संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
आगीमुळे वॉशिंग मशीन, संसारोपगी साहित्य, कपडे-लत्ते, अंथरूण, इलेक्ट्रीक फिटींग जळाल्याने सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले. आग विझवण्याकामी प्रथमेश गुलईकर, प्रवीण पाटील, कांती जंगले, बापू पाटील, जितेश महाजन, अरुण सूर्यवंशी आदींनी धावपळ केली. शहर वाहतूक शाखेला माहिती मिळताच त्यांनीही माहिती घेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.