स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; शिरपुरातून लांबवलेली दुचाकी जप्त
जळगाव – जळगाव शहरात झालेल्या चैनचोरीच्या घटनांमध्ये संशयीत आरोपी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून कारनामे करीत असतांना पोलिसांनी फुटेजच्या आधारे एका संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने शिरपूर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. विशेष बाब म्हणजे अटकेतील आरोपी हा कुविख्यात दरोडेखोर असून त्याच्यावर जळगाव शहर व एमआयडीसी पोलीस ठाण्यासह धरणगाव, चोपड्यात गुन्हे दाखल आहे तर शिरपूर पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही केल्याची माहिती पुढे आली आहे. जून 2017 महिन्यात शिरपूर येथून चोरलेली दुचाकी आरोपीच्या ताब्यातून गुन्हे शाखेने जप्त केली. मनिष किशोर पाटील (25, खोटे नगर, द्वारकानगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नसरूद्दीन शेख, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, शशिकांत पाटील, योगेश पाटील, विलास पाटील, दीपक पाटील, गफुर तडवी, दर्शन ढाकणे आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.