शोपियानमध्ये विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली; ११ विद्यार्थी ठार

0

शोपियान: विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मिनी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ११ विद्यार्थी ठार झाले आहे. यामध्ये ९ मुलींचा समावेश आहे. तर इतर ७ जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली आहे.

पुंछ येथील एका कॉम्प्युटर कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मिनी बस शोपियाँ मार्गावरील मुघल रोडने जात होती. दरम्यान, एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ‘पिर की गली’ भागात ही बस दरीत कोसळली. जखमींना उपचारांसाठी शोपियाँतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितले की, राज्यात ही अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल. त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेशही मलिक यांनी प्रशासनाला दिले.