शौचालयाची दैनावस्थाच सुटेना

0

भुसावळ। केंद्रीय समितीने भुसावळ शहर हागणदारीमुक्तत झाल्याचे नुकतेच जाहीर केले. मात्र शहरातील बहुतांश भागात सार्वजनिक शौचालयांची दैनावस्था झालेली असून याठिकाणी नागरिकांना शौचास बसणे देखील शक्य नाही. त्यामुळे गुणवत्ता परिषदेच्या पथकाने हागणदारीमुक्तीचा अहवाल दिला कसा असा प्रश्‍न जनाधार पार्टीच्या नगरसेविका संगिता देशमुक यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन दिले आहे.

हागणदारीमुक्तीचा केवळ गवगवा
केंद्र शासनाच्या गुणवत्ता परिषदेच्या पथकाद्वारे हागणदारीमुक्ती संदर्भात गेल्या महिन्यात शहरातील नऊ ठिकाणी शौचालयांची पाहणी करण्यात आली होती. या पथकाने सादर केलेल्य अहवालानुसार भुसावळ शहर हागणदारीमुक्त झाले असल्याचे दिल्ली येथील केंद्रीय समितीने जाहीर केले आहे. यामुळे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे अस्वच्छ शहर असल्याचा कलंक काहीसा पुसला गेला असल्याचा गवगवा सत्ताधार्‍यांनी केला असल्याचा आरोप नगरसेविका देशमुख यांनी केला आहे.

पाहणीवर शंका
या पथकाद्वारे झोपडपट्टी, रहिवाशी, व्यापारी, शैक्षणिक तसेच विशेष स्थळांची पाहणी केली होती. त्याबाबतचा अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केला होता. या अहवालानुसार संपूर्ण भुसावळ शहर हगणदारीमुक्त झाले असल्याचे दिल्ली येथील केंद्रीय समितीकडून पालिका प्रशासनास सुचित करण्यात आले आहे. मात्र शहरातील काही भाग म्हणजेच आगाखान वाडा, मटण मार्केट, फुकटपुरा, पंचशिल नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, आठवडे बाजार, काझी प्लॉट परिसरातील सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.

अडचणींचा सामना
या परिसरात कचर्‍याचे ढिग साचले आहेत. कुठे शौचालयांचे सीट्स तुटलेले आहेत. तर काही ठिकाणी मलनिस्सारण होत नसल्यामुळे शौचालय चोकअप झालेल्या आहेत. मात्र, केंद्रीय समितीने 5 रोजी अहवाल दिला. हा अहवाल कोणत्या आधारे समितीने दिला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत शहर देशात दुसर्‍या क्रमांकावर आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका संगिता देशमुख यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे.