बारामती । स्वच्छ व सुंदर बारामती म्हणून ओळख निर्माण केलेल्या बारामती शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये शौचालयाची व्यवस्था नसल्याने लोकशाही युवक संघटनेने शुक्रवारी बारामती नगरपरिषदेपुढे अनोखे आंदोलन केले. आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी कमोड हाती घेत उपस्थितांसमोर बॉक्स फिरवून भीक मागो आंदोलन केले. दरम्यान, दलित वस्ती योजनेचा निधी इतरत्र वापरून नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे येणार्या काळात हे काम न झाल्यास नगरपरिषदेच्या अधिकार्यांसह पदाधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
प्रभाग क्रमांक 18 मध्ये शौचालय नसल्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही नगरपरिषद प्रशासनासह नगराध्यक्षा, गटनेते याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत लोकशाही युवक संघटनेने बारामती नगरपरिषदेसमोर भिक मांगो आंदोलन केले. या आंदोलनात बहुजन समाज पक्षाचे काळूराम चौधरी, लोकशाही युवक संघटनेचे अध्यक्ष अनिकेत मोहिते, रोहित पिल्ले, अभिलाष बनसोडे, सुमित मोरे, मंगलदास निकाळजे, अक्षय शेलार आदींनी सहभाग घेतला.
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
सार्वजनिक शौचालये पुरेशी नाहीत. उपलब्ध शौचालयाची दुरुस्ती केली जात नाही. याबाबत बारामती नगरपालिकेला वारंवार लेखी व तोंडी कळवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित अधिकारी व नगरसेवकांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही युवक संघटनेने यापूर्वी 24 ऑक्टोबर 2017 रोजी आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरही जाणिवपूर्वक या प्रभागात सार्वजनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. नगरपरिषद प्रशासनाला जाग यावी यासाठी नगरपरिषदेसमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत वारंवार केवळ आश्वासने दिली जात असल्याने यापुढील काळात नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाच्या तोंडाला काळे फासणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.