आंबेगाव । आंबेगाव तालुक्याच्या पारगाव (शिंगवे) गावातील 40 टक्के अपंग असलेल्या व्यक्तींनी शौचालय बांधले नसेल, तर त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी अपंगहीत विकास व पुनर्वसन संघाच्या वतीने 1 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. पारगाव ही मोठी बाजारपेठ आहे. हे गाव पूर्ण हागणदारीमुक्त करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु या प्रयत्नांना शंभर टक्के यश आले नाही. अजूनही अनेकजण उघड्यावर शौचाला जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर शौचास जाऊ नये, त्याचप्रमाणे गावातील 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्तीने शौचालय बांधले नसल्यास त्यांनी 3 डिसेंबर रोजी असणार्या जागतिक अपंग दिनापर्यंत शौचालयाचे काम पूर्ण केल्यास 1000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तरी ज्या अपंगांचे शौचालय बाकी असेल त्यांनी अपंगहीत विकास व पुनर्वसन संघाकडे संपर्क साधावा, असे आवाहन दीपक ढोबळे यांनी केले आहे.