सुमन भोंडवे व संकेत भोंडवे यांचा सन्मान
पिंपरी-चिंचवड : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग आणि श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्या वतीने देण्यात येणारे ’श्यामची आई’ व ’श्याम’ पुरस्कार यंदा उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे व त्यांच्या मातोश्री सुमन शांताराम भोंडवे यांना जाहीर झाले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 23) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात दुपारी चार वाजता पार पडणार आहे.
भाई वैद्य, पी. डी. पाटील अतिथी
पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, आदर्श गाव प्रकल्प योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, तसेच स्वागताध्यक्ष म्हणून सुरेश शिरुडे, प्रमुख उपस्थिती रामचंद्र जाधव यांची असणार आहे.
प्रयोगशाळेचेही होणार उद्घाटन
दरम्यान दुपारी साडेतीन वाजता चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या भूगोल प्रयोगशाळेचे उदघाटन डॉ. पी. डी. पाटील व पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे व श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे संचालक विजय जाधव यांनी दिली.