श्याम मानवांचा अपशकुन!

0

तीन शतकांच्या मराठी साहित्य परंपरेचा वाडःमयीन उत्सव यंदा बुलडाणा जिल्ह्यातील विवेकानंद आश्रमाच्या प्रांगणात साजरा होऊ घातला आहे. हा साहित्य सोहळा मराठीजनांचा वार्षिक आनंदसोहळा असतो. साहित्यिकांबरोबरच रसिकांसाठीही ती आनंदपर्वणी असते. 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अगदी तोंडावर आले असताना, हे संमेलन विदर्भातील मानवहितकारी संत शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमातच का आयोजित करत आहात? असा सवाल करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्याम मानव व त्यांच्या काही सहकार्‍यांनी विरोध दर्शविला. या मंडळींना महाराजांविषयी आक्षेप असून, त्यांनी त्यांचा भंडाफोड केला होता, असा त्यांचा दावा आहे. वस्तूस्थिती मात्र काही वेगळीच दिसते. मानव व त्यांचे सहकारी निव्वळ स्वस्त प्रसिद्धीसाठी हा खटाटोप करत असल्याचे दिसून येते. यानिमित्ताने साहित्य संमेलनाच्या आयोजनाला अपशकुनही त्यांनी केला. ज्या महाराजांवर ते टीकास्त्र डागत आहेत, त्या शुकदास महाराजांवर त्यांनी टीका करू नये, त्यांची बदनामी करू नये, असा मनाई हुकूमच अकोला येथील सहदिवाणी न्यायालयाने 2001 मध्ये जारी केला होता. याचा अर्थच स्पष्ट आहे, की मानव व त्यांच्या सहकार्‍यांचे आरोप तकलादू आहेत, ते कायद्याच्या कसोटीवर खरे नाहीत, आणि मानवांना शुकदास महाराजांची बदनामी करण्याची हुक्की आलेली असावी. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये एक पुसटशी रेषा असते. ही रेषा ओलांडण्याचे काम विवेकानंद आश्रमात झाले किंवा नाही, याची खातरजमा मानवांनी केलेली दिसत नाही. त्यामुळे साहित्यक्षेत्रातील एक मोठा वर्ग साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीच्या पाठीशी उभे राहिलेला दिसतो. मानव यांचा शुकदास महाराजांना विरोध असू शकतो, हिवरा आश्रम या स्थळाला विरोध का? हा प्रश्न जेव्हा रसिक समाज विचारात आहे, त्याचे उत्तर मानव यांच्याकडे नाही.

अलिकडे साहित्य संमेलने आणि वाद यांचे समिकरणच बनलेले आहे. परंतु, वाद निर्माण करणारी कारणे तपासली असता ती अत्यंत तकलादू दिसून येतात. संमेलन हा मराठी माणसांच्या अस्मितेला साद घालणारा उत्सव आहे; त्यामुळे या संमेलनाकडून सार्‍यांच्याच अपेक्षा असतात. संमेलनाच्या तारखा, ठिकाण, आयोजक, स्वागताध्यक्ष या बाबी वादाचे कारण बनत असतात. खरे तर साहित्य ही संवादाची प्रक्रिया असायला हवी. अशी संमेलने साहित्यविश्व समृद्ध करणारी संवादप्रक्रिया निर्माण करणारे असावेत. तथापि, जेव्हा वाद निर्माण होतात, त्यातून एक विसंवादाची परंपराही दुर्देवाने निर्माण होत जाते. संमेलनस्थळाहून श्याम मानव यांनी जे काही आक्षेप नोंदविलेत, ते आक्षेप खरे तर निरर्थक होते, तरीही वादाला खतपाणी घालणार्‍या प्रसारमाध्यमांनी त्याला फुंकर घातली. अशी फुंकर घातली की, अनेकांना चेव चढतो. तसा तो अनेकांना चढलाही. त्यातून कुणी समर्थनात तर कुणी विरोधात मते नोंदवली, त्यातून हाशील काहीही झाले नसले तरी मराठी माणसांचे मनोरंजन मात्र चांगले झाले. शुकदास महाराज यांना विरोध म्हणून हिवरा आश्रमात साहित्य संमेलन नको, अशी भूमिका जेव्हा मानव मांडतात, तेव्हा ते जिजाऊंच्या, ना. घ. देशपांडे किंवा सदानंद देशमुखांच्या जिल्ह्याला अव्हेरत असतात. त्यांचे हे अव्हेरने कोणत्या तत्वात बसते? साहित्य संमेलने ही सरस्वती उपासकांची नवपौर्णिमा असते. वर्षभरात निर्माण झालेल्या साहित्यकृती या व्यासपीठाद्वारे रसिकांसमोर सादर करणे हेच या सोहळ्याचे उद्दिष्ट आहे. त्यातून उद्याचे गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, कुसुमाग्रज, शंकरराव खरात, दया पवार, इंद्रजीत भालेराव, पु. ल. देशपांडे, ग्रेस आदी साहित्यिक तयार होत असतात. प्रबोधन आणि लोकशिक्षणाचे अतिशय प्रभावी माध्यम असणार्‍या साहित्याकडून मराठी मातीला मोठ्या अपेक्षा आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या सारस्वतांच्या साहित्यातून ही माती प्रगल्भ होत असते. तेव्हा साहित्य संमेलने आणि वाद ही प्रथा आता मोडीत निघायला हवी. दुर्देवाने तसे होताना दिसत नाही.

कुणी तरी उपटसुंभ एखादा वाद उपस्थित करतो, आणि त्याला काही नकारात्मक मानसिकतेची माणसे खतपाणी घालतात, हा दुर्देवी प्रकार आहे. हा प्रकार थांबायला हवा. त्यासाठी निरर्थक वाद उपस्थित करणारे मानवांसारखे माणसेही वेळीच आवरावे लागतील. साहित्य संमेलने ही राजकारण्यांच्या ताब्यात जाऊ लागली आहेत. काल-परवापर्यंतची काही संमेलने पाहाता, तसे दिसून आले आहे. खरे पाहाता, कोणत्याही सांस्कृतिक महोत्सवांना साहित्य संमेलनाइतकी प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळेच या निमित्ताने प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हौस फिटविण्यासाठी राजकीय मंडळी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी खांद्यावर घेत असतात. साहित्यिक आणि राजकारणी यांच्यातील संबंध तसे नवखे नसले तरी, अलिकडच्या काळात ही परंपरा जरा जास्तच घट्ट होत चालली आहे. त्यामुळे 91 वे साहित्य संमेलन हे अराजकीय व्यक्तीच्या वा संस्थेच्या आयोजनात पार पडत असल्याचे पाहून आम्हाला समाधान वाटते. विवेकानंद आश्रम ही खरे तर सेवाभावी संस्था. तेथे दीन, दलित आणि पीडितांची सेवा घडते. आता सारस्वतांचीही सेवाही या संस्थेला करता येणार असल्याचे पाहून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. केवळ कुण्या तरी आश्रम वा बुवा-बाबाच्या मठात संमेलन आयोजित होते म्हणून मानवांना द्वेषाची कावीळ होणे चांगले नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धेची पुसटशी रेषा पुसण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या कोषात होणे गरजेचे असते. हिवरा आश्रमला स्थळ म्हणून विरोध करणे हा श्याम मानवांचा प्रसिद्धीचा हव्यास आहे, त्यात उडी घेऊन कुणी मानवांची तळी उचलत असेल तर तो प्रकार साहित्य संमेलनाला अपशकुन करण्याचाच प्रकार होय!