श्रीकृष्णाच्या जयघोषाने दुमदुमले शहर

0

जळगाव। ’हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे’, जय जगन्नाथा’च्या गजराने जळगाव शहर इस्कॉनतर्फे काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथ मिरवणुकीने दुमदूमले. रथयात्रा मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते. यात महिला भाविकांनी सहभागी होवून जगन्नाथ महाराजांचा रथ ओढला.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) येथील शाखेतर्फे शनिवारी 17 रोजी जगन्नाथ यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त शहरातून रथयात्रा मिरवणुक काढण्यात आली. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्यासह गौरकृष्ण प्रभू (डेंमार्क), सुंदरलाल प्रभू (मॉरीशस), असिमकृष्ण (मुंबई), शचिनंदन (वृंदावन), अमियरस, सुंदर चैतन्य प्रभु, रेवती रमण आदींच्या उपस्थितीत यावेळी होती. रथयात्रा मिरवणुक निघण्यापुर्वी पूजा व आरती करण्यात आली. यानंतर शहरातून वाजतगाजत हरे राम हरे कृष्णा’चा गजर करत रथ मिरवणुकीला सुरवात झाली. शिवतीर्थ मैदानापासून रथयात्रेला सुरवात होवून नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक, भास्कर मार्केट, बहिणाबाई उद्यान, रिंग रोड, ख्वाजामियाँ चौकमार्गे कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गाने जावून शिवतीर्थ मैदानावर रथयात्रेचा समारोप झाला.