श्रीगोंदा शहरात भुरट्या चोरांमुळे नागरिक त्रस्त

0

श्रीगोंदा- श्रीगोंदा शहरात गेल्या अनेक महिन्यापासून भूरट्या चोरांमूळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भर बाजार पेठांमधून मोटरसायकली चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच सोमवारी आठवडे बाजारात शहरातून मोठ्या प्रमाणात मोबाईल, पाकिटे,चोरीला जात आहेत  यामुळे भामट्यांवर पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या भामट्यांना पोलिसांचा आश्रय असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.श्रीगोंदा तालुक्यात गेल्या अनेक महिन्यापासून शहरात भुरट्या चोरांनी थैमान घातले आहे.

मोबाईल चोरी, पाकिट मारणे, धूम स्टाईलने चोर्‍या, मोठ्या वाहनांच्या बॅटर्‍या चोरणे, चाके चोरून नेणे. यामुळे शहरातील नागरीक भयभीत झाले आहेत. त्याच बरोबर घरफोड्या सुरूच आहे. तसेच रात्रीच्या दरम्यान व भर दिवसा मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या दरम्यान जर कोणी पोलिसांत गुन्हा दाखल केला तर ती मोटरसायकल परत मिळत नाही. चोरी गेलेली मोटरसायकल परत मिळविणे व पोलिसांची झंझट नको म्हणून नागरीक पोलिस ठाण्यात जाण्याचे टाळतात. या घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर मोटरसायकल टोळी ही शहरातीलच आहे. हे सर्वांना माहित आहे. मात्र, पोलिस त्यांच्यावर कारवाई का करत नाही. पोलिस प्रशासना बरोबर या टोळीचे काही आर्थिक हितसंबंध आहे का?असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारून सुमारेेेे तीन होत आले. तरी सदर चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.