पुणे : सातशे वर्षांची परंपरा असलेल्या पंढपूर वारीला हरित वारी करण्याच्या उद्देशाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने पुढील पाच वर्षात पालखीच्या विविध मार्गांवर निरनिराळ्या प्रकारांची पन्नास लाख देशी झाडे लावण्यात येणार आहेत. गणेशोत्सावासह वारीची परंपरा जपण्याचाही ट्रस्टचा मानस आहे, अशी माहिती दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आणि कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली. दैनिक जनशक्तिच्या पुणे आवृत्ती कार्यालयास या उभयंतांनी सदिच्छा भेट देत, संपादकीय सहकार्यांशी संवाद साधला व दिलखुलास चर्चा केली. याप्रसंगी जनशक्तिचे मुख्य संपादक कुंदन ढाके यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे, सहसंपादक अजय सोनावणे, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे, मुख्य उपसंपादक श्रीपाद आठल्ये यांच्यासह संपादकीय सहकार्यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती.
पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम…
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले, की हरित वारी या उपक्रमाची सुरूवात 19 जूनरोजी देहू येथील वैकुंठ मंदिर येथे करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगत्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत सोपान महाराज यांच्या पालखी मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण केले जाईल. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर मुक्कामाची ठिकाणे पहिल्या टप्प्यात हरित केली जाणार आहेत. महाराष्ट्रात 350 पालख्या निघतात आणि त्या सर्व वाखरी येथे एकत्र येतात, या सर्व पालख्यांच्या मार्गावर हरित वारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता पाच वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. हा कार्यक्रम आखताना संस्थानांचे विश्वस्त, काही दिंडीप्रमुख, कृषितज्ज्ञ अशांकडून सूचना घेण्यात आल्या आहेत. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. उपक्रमास वनराई, देवराई व काही शासकीय संस्था, टाटा उद्योग समूह आणि काही मोठे उद्योग समूह मदत करणार आहेत. वृक्षांचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. निर्मल वारी होण्यासाठी ट्रस्ट प्रयत्न करित आहे. त्यालाही अधिक चालना दिली जाईल. माजी खासदार प्रदीप रावत यांच्याशीही चर्चा झाली असून, त्यांच्या संस्थेचीही मदत घेतली जाणार आहे.
आदर्श दिंडी स्पर्धाही घेणार…
सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक वळण मिळावे याकरिता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आदर्श गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येतात, त्याच धर्तीवर पालखीमध्येसुद्धा आदर्श दिंडी अशी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात साडेचारशे दिंड्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात साडेतीनशे दिंड्या सहभागी होतात. त्यातून आदर्श दिंडी निवडली जाईल. विजेत्या दिंडीला चांदीचा मानदंड दिला जाईल. हा पुरस्कार फिरता राहील. त्यामुळे सार्या महाराष्ट्रात दिंडी परंपरेला एक आगळेवेगळे महत्व येईल, अशी माहिती गोडसे यांनी दिली. नमो चंद्रभागा या उपक्रमात प्रतिवर्षाप्रमाणे ट्रस्ट सहभागी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.