रिक्षाचालकांना सीएनजी किटसाठी वाटले होते धनादेश
पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा एक भाग म्हणून हवा प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने शहर परिसरातील सीएनजी कीट बसविलेल्या तीनचाकी ऑटो रिक्षा परवानाधारकांना महापालिकेने मोठा गाजावाजा करत अनुदान वाटप केले. मात्र, महापालिकेच्या बँक खात्यामध्ये असलेल्या अपुर्या रकमेमुळे अनुदानाचे हे धनादेश ’बाऊन्स’ झाल्याचे समोर आले आहे. श्रीमंत महापालिकेने दिलेला धनादेश बाऊंन्स झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रिक्षाचालकांच्या चुकीमुळे धनादेश बाऊंन्स झाल्याचा दावा करत महापालिकेने याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
653 जणांना अनुदान वाटप
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा एक भाग म्हणून हवा प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने शहर परिसरातील सीएनजी कीट बसविलेल्या 333 जुन्या तीनचाकी ऑटो रिक्षा परवानाधारकांना महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते 12 हजार रुपये अनुदान वाटपाचे धनादेश वितरित करण्यात आले होते. या योजनेंतर्गत एकूण 1270 अर्ज प्राप्त झालेले असून, यामध्ये पात्र ठरलेल्या 986 जणांपैकी 653 पात्र रिक्षा परवानाधारकांना पहिल्या दोन टप्प्यात अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 284 रिक्षा परवानाधारकांनी प्रलंबित कागदपत्रे सादर केल्यानंतर तसेच आरटीओकडून तपासणी यादी प्राप्त झाल्यानंतर अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
अपुर्या रकमेमुळे नामुश्की
महापालिकेने बँक ऑफ बडोदाचे धनादेश दिले आहेत. रिक्षाचालकांनी ते धनादेश आपल्या खात्यावर भरले. परंतु, ते धनादेश बाऊंन्स झाले आहेत. महापालिकेच्या खात्यामध्ये अपुरी रक्कम असल्यामुळे धनादेश बाऊंन्स झाल्याचे कारण बँकेने दिले आहे. यामुळे रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली. श्रीमंत महापालिका, अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अपुर्या रकमेमुळे 12 हजार रुपयांचा धनादेश बाऊंन्स झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेचा धनादेश बाऊंन्स होत नाही. काही रिक्षाचालकांचे बँक खाते वेगळ्या नावाने आहेत. तर, धनादेशावर वेगळेच नाव टाकण्यात आले आहे. अशा दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये महापालिकेची कोणतीही चूक नाही.
-संजय कुलकर्णी, कार्यकरी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका