श्रीरामनगर रस्त्यावर संरक्षक कठडे बसविण्याची मागणी

0

खेड शिवापूर । श्रीरामनगरचा रस्ता गायमुख येथे वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्यालगत संरक्षक कठडे बसविण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांमधून होत आहे. हा रस्ता पुणे-सातारा महामार्ग ते तीर्थ क्षेत्र कोंढणपूर रस्त्याला जोडलेला आहे.

या रस्त्याचे काही वर्षापूर्वी खेड शिवापूर ग्रामपंचायतीच्या पुढाकारने सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. खेड शिवापूरला जाण्यासाठी हा रस्ता जवळचा असून श्रीरामनगर येथील विद्यार्थी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या ठिकाणी सुप्रसिद्ध हजरत पीर कमर अली दुर्वेश बाबांचा दर्गा असल्याने या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ असते. परंतु या रस्त्यादरम्यान श्रीरामनगर गावच्या हद्दीत गायमुख असून, सुमारे 50 फुट खोल दरी आहे. रस्त्याच्या लगत असणारा भराव खचला असून या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी धोक्याची सूचना असलेले फलक लावावे, संरक्षक कठडे बसवावेत. यासाठी खेड शिवापूर आणि श्रीरामनगर ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व विद्यार्थी करीत आहेत.