श्रीरामपूरातील सराईत गुन्हेगार जळगाव एलसीबीच्या जाळ्यात : चार पिस्टल व 10 काडतूस जप्त

Criminals from Srirampur with four village pistols and 10 live cartridges in Jalgaon crime branch’s net चोपडा : चार गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस बाळगणार्‍या श्रीरामपूरातील दोन अट्टल गुन्हेगारांच्या जळगाव गुन्हे शाखेने चोपडा शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. संशयीतांचा एक साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाला आहे. गावठी कट्ट्यांची तस्करी या कारवाईनंतर पुन्हा चर्चेत आली असून उमर्टी भागातील कारखाने समूळ नष्ट करण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना काही संशयीत चोपडा येथे गावठी कट्टा खरेदीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने रविवार, 13 नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात सापळा रचला. संशयीत कार आल्यानंतर तिची झडती घेतल्यानंतर त्यातून चार गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पथकाने राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (32, रा. खंडाळा, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), गणेश ज्ञानेश्वर सातपुते (23, रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आली तर अंधाराचा फायदा घेत बबन उर्फ रोहित जाधव (रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनर) पसार झाला.

चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे दीपककुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25सह भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या तिघांविरोधात श्रीरामपुर तालुक्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.