श्रीराम मंदिर होतेय नां, खोडा कशाला घालता?

0

अमित महाबळ:
श्रीराम जन्मस्थळाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतानाच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभारणीचे सांगितले होते. त्यावर आता कार्यवाही होते आहे एवढेच. हे काम गेल्या वर्षापासूनच सुरू आहे. पायाभरणीच्या तोंडावर काहींच्या तोंडी आमच्यामुळे मंदिर होतेय अशी अहंकाराची भाषा आहे. ती त्यांनाही न शोभणारी आहे. कोणी कोणासाठी काय केले, आता काय करताहेत हे सर्वांनाच ठावूक आहे. ज्यांनी आपला आत्मसन्मान व सत्त्व विकले आहे त्यांनी इतरांच्या आत्मसन्माला ठेच बसेल अशा तर्‍हेने निदान वागू तरी नये. अयोध्येत श्रीराम मंदिर होऊच नये म्हणून आजवर अनेक अडथळे आणले गेले. आता ते होत आहे म्हटल्यावर त्यात खोडा घालण्याचे पाप करू नये.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीराम मंदिराची पायाभरणी होण्यास अवघा एक दिवस बाकी राहिलेला असताना, जगभरातील असंख्य लोकांच्या मनात वसलेले मंदिर प्रत्यक्षात साकार होणे ही गोष्ट अजूनही काहींच्या पचनी पडलेली दिसत नाही. दररोज या विषयावरून नवनवे वाद निर्माण होतील, अशा तर्‍हेची वक्तव्ये केली जात आहेत. काही व्यक्तींना मंदिराची पायाभरणी करून देशातील कोरोना जाणार नसल्याचे वाटते, काही गट हे श्रेयवादाच्या लढाईत गुंतले आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील टाइम स्क्वेअरवर 5 ऑगस्टला श्रीरामांची भव्य प्रतिमा साकारली जाणार आहे. म्हणजे मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याचे वारे त्या ठिकाणीही आहे. हे मान्य करायला हवे. जगभरातील बहुसंख्य श्रीरामभक्तांची इच्छा माहित करून घेण्यात मंदिराच्या पायाभरणीला विरोध करणारे कमी पडत आहेत का? असे आता वाटू लागले आहे. रामजन्मस्थळी मंदिर उभे राहणे हा केवळ एखादी वास्तू, धर्म किंवा संस्कृतीचा प्रश्‍न नाही तर गेल्या सातशे ते आठशे वर्षात ज्या-ज्या विदेशी आक्रमकांनी भारताला लुटून नेले, गुलाम बनवले होते त्या-त्या प्रत्येकाला हे मंदिर होणे म्हणजे एक प्रकारे प्रत्युत्तर असल्याचे मानणारेही बरेच आहेत.

स्वतःचा आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी 80 च्या दशकापासून अयोध्येत मोठ्या प्रमाणात जन आंदोलने उभी राहिली. कारसेवा घडली. कारसेवकांनी बाबरी मशिद पाडून तेथे रामलल्लांना विराजमान केले. यातून धार्मिक दंगली उसळल्या, प्रचंड हिंसाचार झाले. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जागेच्या मालकी हक्काबाबत दावे दाखल करण्यात आले होते. त्यावर प्रदीर्घ कामकाज होऊन निकाल लागला आणि कथित वादग्रस्त जमिन श्रीराम मंदिरासाठी मिळाली. हे सत्य मंदिराला विरोध करणार्‍या पक्षकारांनीही स्वीकारले. न्यायालयाने श्रीरामलल्लाचा जागेवरील हक्क मान्य करताना अयोध्यानगरीतच मशिदीसाठी पाच एकर जागा देण्यासही सांगितले. न्यायालयाच्या निकालानंतर श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला. त्याचे कामकाज सुरू झाले आणि आता प्रत्यक्ष मंदिराची पायाभरणी होऊ घातली आहे. दुसरीकडे पाच एकर जागेत मशिद उभारण्याचीही तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मुस्लीम बांधवांनी ट्रस्ट स्थापन केला आहे पण त्याला अजून पूर्ण स्वरुप प्राप्त झालेले नाही. ट्रस्टमधील संपूर्ण नियुक्त्या व्हायच्या आहेत. श्रीराम जन्मस्थळाच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात चाललेल्या कामकाजात अनेक ऐतिहासिक तथ्थे समोर आली. या जागेत पूर्वी मंदिर होते याचे पुरावे पुरातत्व खात्यामुळे जगाला कळले. गेली 25 ते 30 वर्षे मंदिराभोवती संपूर्ण देशाचे राजकारण फिरले. मंदिराच्या मुद्यावरच केंद्रात सरकारे बनली आणि ती पाडलीदेखील गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार 2014 मध्ये केंद्रात पुन्हा एकदा सत्तारुढ झाले. परंतु, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या तुलनेत मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएला लोकसभेच्या 543 पैकी 336 जागांचे मिळालेले प्रचंड बहुमत हे वेगळेपण ठरले. या निवडणुकीत भाजपाने 282 जागा जिंकल्या होत्या. वाजपेयी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांच्यावरही श्रीराम मंदिर साकारण्यासाठी परिवारातून मोठा दबाव होता. त्यानंतर केंद्रात ‘आरंभ है प्रचंड’ दाखवून देणारे मोदी हे लवकरात लवकर मंदिर साकारतील ही अपेक्षा वारंवार व्यक्त केली गेली. परंतु, सरकारने न्यायालयीन निकालाची वाट पाहिली. घटनाबाह्य ठरेल, असे कोणतेही पाऊल उचलले नाही. अयोध्येत मंदिर उभे राहीपर्यंत आणि त्यानंतर पुढची अनेक वर्षे या मंदिराभोवती राजकारण फिरत राहणार आहे. हिंदूंचा आत्मसन्मान म्हणूनच या वास्तूकडेे पाहिले जाईल. अखंड भारत, समान नागरी कायदा, अयोध्येत श्रीराम मंदिर, काश्मीरमधून कलम 370 हटवणे यासारखे मुद्दे भाजपाच्या अजेंड्यावर राहिले आहेत. त्यापैकी काय झाले आणि काय बाकी आहे हे जनतेसमोर आहे. त्यामुळे या निर्णयांचा राजकीय लाभ नक्कीच उठवला जाईल. श्रीराम मंदिरासाठी जनआंदोलन उभारले जात असताना ‘अयोध्या एक झाकी है, काशी-मथुरा बाकी है’ यासारख्या घोषणा दिल्या जायच्या.

देशाच्या राजकारणाची, विचारांची दिशा बदलत आहे. जे विषय पूर्वीच्या सत्ताधार्‍यांना ताज्य होते त्याच मुद्यांचा आधार घेत विरोधक आज सत्ताधारी बनले आहेत आणि ते आपला खुंटा अधिकच बळकट करत आहेत. त्यांना लोकांचे समर्थनही लाभत असल्याचे 2014 व 2019 मधील लोकसभा निवडणुकांनी दाखवून दिले आहे. राहिला मुद्दा मंदिराची पायाभरणी आताच करण्याची घाई का? आणि त्यामुळे कोरोना जाईल का? यासारख्या प्रश्‍नांचा. मुळातून मंदिराची पायाभरणी झाल्यामुळे देशातून कोरोना पळून जाईल हे कोणीही म्हटलेले नाही हे समजून घेतले पाहिजे. श्रीराम जन्मस्थळाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतानाच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभारणीचे सांगितले होते. त्यावर आता कार्यवाही होते आहे एवढेच. हे काम गेल्या वर्षापासूनच सुरू आहे. पायाभरणीच्या तोंडावर काहींच्या तोंडी आमच्यामुळे मंदिर होतेय अशी अहंकाराची भाषा आहे. ती त्यांनाही न शोभणारी आहे. कोणी कोणासाठी काय केले, आता काय करताहेत हे सर्वांनाच ठावूक आहे. ज्यांनी आपला आत्मसन्मान व सत्त्व विकले आहे त्यांनी इतरांच्या आत्मसन्माला ठेच बसेल अशा तर्‍हेने निदान वागू तरी नये. अयोध्येत श्रीराम मंदिर होऊच नये म्हणून आजवर अनेक अडथळे आणले गेले. आता ते होत आहे म्हटल्यावर त्यात खोडा घालण्याचे पाप करू नये.