नवी दिल्ली । फिरोझशहा कोटला मैदानात खेळल्या गेलेल्या दिल्ली कसोटी सामन्यात पराभवाला लांब ठेवण्यात श्रीलंकेच्या फलंदाजांना यश मिळाले आहे. या कसोटीतील चौथ्या डावात 100 हुन अधिक षटके गोलंदाजी करुनही भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेच्या फलंदाजांना बाद करण्यात अपयश आले. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा कसोटी अनिर्णित अवस्थेत संपला. धनंजय डिसिल्वाने (119 रिटायर्ड हर्ट) अडचणीच्या काळात शतक ठोकून सामना अनिर्णित राखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याचवेळी भारताने सलग नववी कसोटी माला विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे. डिसिल्वाने रिटायर्ड हर्ट होण्याआधी 219 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 119 धावांची खेळी करताना कर्णधार दिनेश चंडिमलसोबत (36) पाचव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. पाचव्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा करण्यात आली त्यावेळी श्रीलंकेच्या दुसर्या डावात 103 षटकांमध्ये 5 बाद 299 धावा झाल्या होत्या. रोशन सिल्वा (74) आणि निरोशन डिक्वेला 44 धावांवर खेळत होता.
बीसीसीआयचा दिल्लीबाबत कठोर निर्णय
भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर तिसरी कसोटी खेळवण्यात आली. या सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू बराच वेळ मास्क लावूनच मैदानात खेळताना दिसत होते. या सामन्यादरम्यान, प्रदूषणाचा बराच त्रास झाल्याची तक्रार श्रीलंकन खेळाडूंकडून वारंवार करण्यात येत होती. दरम्यान, या सर्व घटनेनंतर बीसीसीआयनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2020 पर्यंत क्रिकेटचे कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने या मैदानात खेळवण्यात येणार नाही. बीसीसीआयच्या रोटेशन पॉलिसीनुसार, आता दिल्लीत 2020 पर्यंत एकही आतंरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार नाही.बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, रोटेशन पॉलिसीनुसार, कोटलावर एक कसोटी सामना आणि नोव्हेंबरमध्ये एक टी-20 सामना खेळवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षापर्यंत तरी दिल्लीत सामना होणार नाही. इतर ठिकाणीही सामने भरवणे बाकी आहे. त्यामुळे 2019 साली जेव्हा नवीन दौर्याची आखणी केली जाईल त्यानंतरच कोटलावर बहुधा सामने खेळवले जातील. 2020 साली पर्यावरणाची स्थिती कशी असेल याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. त्यामुळे कोटलावर सामने न खेळवण्याचा निर्णय हा फक्त रोटेशन पॉलिसीनुसार असणार आहे. असेही या अधिकार्याने स्पष्ट केले. दिल्लीतील या कसोटीत प्रदूषणामुळे तब्बल 26 मिनिटे खेळ थांबवण्यात आला होता.
विराटच्या नेतृत्वाखाली आणखी एक विक्रम
भारतीय संघाने नऊपैकी नऊ कसोटी मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत, हे विशेष. भारतीय संघाने ही कामगिरी बजावून सलग कसोटी मालिका विजयांच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताने 2015 सालच्या सप्टेंबरपासून आजवर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताने 2015 साली श्रीलंकेला श्रीलंकेत आणि दक्षिण आफ्रिकेला भारतात धूळ चारली होती. मग 2016 साली भारताने वेस्ट इंडिजला विंडीजमध्ये तर न्यूझीलंड आणि इंग्लंडला भारतात हरवण्याची किमया केली होती.