श्रीवर्धनमध्ये शाळांना पोषण आहार बंद

0

श्रीवर्धन । तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 13 शाळांमध्ये तांदूळ साठा उपलब्ध नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सरकारकडून दिला जाणारा मोफत पोषण आहार बंद झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उघड झाली आहे. शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी जिल्हा दौर्‍यादरम्यान श्रीवर्धन तालुक्याला भेट देऊन शिक्षण व आरोग्य खात्यासंदर्भात अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक श्रीवर्धन पंचायत समिती कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रगती अदावडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्यामकांत भोकरे, माजी सभापती सुकुमार तोंडलेकर उपस्थित होते.

13 शाळा अप्रगत
जिल्हापरिषद शिक्षण व आरोग्य सभापती यांनी जिल्हा दौरा करत असताना. श्रीवर्धन तालुक्यातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली होती. यामध्ये शिक्षण व आरोग्यविषयक अनेक समस्यांची उकल करण्यात आली. यावेळी कमी पटसंख्यांमुळे तीन शाळा बंद झाल्या असून, एक ते पाच पटसंख्या असलेल्या 9 शाळा आहेत, तर शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे तेरा शाळा अप्रगत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना शिक्षण सभापती यांनी शिक्षण भरती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेस नाहीत. याबाबत संपूर्ण जिल्ह्यात आढावा घेऊन शासनाकडे मागणी करणार असून, स्वतःच्या कर्जत मतदारसंघातसुद्धा एक शाळा शून्य शिक्षक आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.