कोची । स्पॉटफिक्सिंंग प्रकरणात आजीवन बंदीची कारवाई करण्यात आलेल्या एस. श्रीशांतने या निर्णयाविरोधात निर्णायक लढाई खेळण्याचा निर्णय घेतला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतला केरळच्या एक सदस्यीय खंडपीठाने दिलासा दिला होता. पण बीसीसीआयने पुन्हा याचिका दाखल केल्यावर श्रीशांतला झटका बसला. त्यामुळे श्रीशांतने आता सर्वोच्च न्यायलयाचा दरवाजा ठोठवण्याचे ठरवले आहे. श्रीशांत म्हणाला की आयपीएलच्या 2013 मधील हंगामात झालेल्या स्पॉटफिक्सिंगच्या आरोपामुळे बीसीसीआयने घातलेली आजीवन बंदी रद्द करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
समितीवर आरोप नाही
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकावर मी आरोप केलेले नाहीत. जर एकूण 13 आरोपी होते, तर केवळ मलाच का अपराध्यासारखी वागणूक देण्यात आली. त्यांची नावे जाहिर करा असे कधी म्हणालो नाही. अशा कठीण प्रसंगाला सामोरा जाणारा मीच आहे. त्यामुळे मला या गोष्टी चांगल्या माहित आहेत, असे श्रीशांत म्हणाला. श्रीशांतने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. क्रिकेटशिवाय माझे जीवन सुरळीत सुरू आहे. माझ्या अधिकारांसाठी लढणार आहे. हे प्रकरण केवळ देशासाठी खेळणे इतपत राहिलेले नाही, तर आत्मसन्मान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत काही बोललो नाही. पण आता माझे मत मांडण्याची योग्य वेळ आहे. आता मी बोलण्यास सुरुवात केली आहे. ही केवळ सुरुवात आहे आणखी काही गोष्टी समोर येतील.