श्री दुर्गा विसर्जन मिरवणुकीचा रात्री उशिरापर्यंत उत्साह

भुसावळ शहरात 42 मंडळांचा मुख्य मिरवणुकीत सहभाग : शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Late night excitement of Sri Durga Visarjan procession in Bhusawal town भुसावळ : शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील 161 सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांतर्फे वाजत-गाजत मिरवणूक काढून श्री दुर्गामातेला निरोप देण्यात आला. देवी विसर्जनामुळे शहरातील व्यापारी पेठेत गुरुवारी तुरळक दुकाने सुरू होती तर मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने अनेक रस्ते बॅरीकेट लावून बंद केले होते. रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचा उत्साह कायम होता. यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्याने व दोन वर्षानंतर उत्सव कुठल्याही बंधनाशिवाय असल्याने भाविकांमध्ये दुर्गोत्सवाविषयी प्रचंड जल्लोषाचे वातावरण होते. मुख्य मिरवणुकीत 42 मंडळांचा सहभाग होता तर गुरूवारी दुपारी चार वाजेनंतर विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली तर रात्री 10 वाजेनंतर पोलिसांनी वाजंत्री बंद केली.

वर्दळीच्या रस्त्यांवर बंदोबस्त
गुरूवारी सकाळपासूनच पोलिस व पालिकेच्या कर्मचार्‍यांनी विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावर येणार्‍या सुमारे 14 रस्त्यावर बॅरेकेटस लावल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती तर व्यापारी पेठेतील बहुतांश दुकानेदेखील बंदच दिसून आली. विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभुमीवर पालिकेचे विविध विभागातील 103 कर्मचारी नियुक्त करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व बाजारपेठ हद्दीतील प्रभारी निरीक्षकांच्या उपस्थितीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

तापी नदीवर विसर्जनाची जय्यत व्यवस्था
दुर्गा विसर्जनासाठी तापी नदीवर पट्टीचे पोहणार्‍या 90 जणांचे पथक दोन तीन किनार्‍यांवर वेगवेगळे तैनात करण्यात आले तसेच तापी नदीवर दोन ते तीन ठीकाणी पोहणारे युवक दुपारी एक वाजेपासूनच नियुक्त करण्यात आले. तापी नदीवर 100 फोकस लावण्यात आल्याने लख्ख प्रकाशामुळे देवी विसर्जनासाठी कुठलीही अडचण आली नाही. येथेदेखील पोलिस व पालिकेचे अधिकारी ठाण मांडून होते.

पोलिसांचा शहरात काटेकोर बंदोबस्त
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक, आठ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांनी बंदेबस्ताची कमान सांभाळली शिवाय बाजारपेठ, शहर पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाणे, एलसीबी मिळून 150 पोलिस, 150 होमगार्ड, आरसीपी प्लॉटूनचे 20 पोलिस जवान तैनात करण्यात आले.