श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे उद्या भुसावळात होणार स्वागत

आदिशक्ती श्री संत मुक्ताई 725 व्या अंतर्धान सोहळ्याची जय्यत तयारी

मुक्ताईनगर : टाळ, मृदुंगाचा गजर व विठ्ठलनामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या 725 व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरीनिवासी श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याने सोमवार, 23 रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवले .

विधीवत पूजाद्वारे पालखीचे प्रस्थान
सोमवारी सकाळी सात वाजता श्री पांडूरंगराय पादुकांची विधीवत पूजा व आरती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व शकुंतला नडगीरे यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, सूर्यकांत भिसे, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नित्य उपचार विभाग प्रमुख अतुल बक्षी, प्रतिभा पाटील, सम्राट पाटील, श्रध्दा पाटील, मीना पाटील यांच्यासह विठ्ठलभक्त उपस्थित होते.

आज सोहळ्याचा भुसावळात मुक्काम
हा सोहळा करमाळा, अहमदनगरमार्गे पहिल्या मुक्कामासाठी सायंकाळी औरंगाबाद मुक्कामी पोहोचेला. गारखेडा-औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात सोहळा मुक्कामी राहिला. मंगळवार, 24 मे रोजी भुसावळातील विठ्ठल मंदिर वॉर्डात मुक्काम तर बुधवार, 25 मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे आगमन, दिंडी व दर्शन सोहळा, गुरुवार, 26 मे गुरुवारी जुनी कोथळी ते नवीन मुक्ताई मंदिर पालखी व दिंडी सोहळा, शुक्रवार, 27 मे द्वादश पारणे, नैवेद्य व सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. सोहळा चिखली येथे मुक्कामी पोहोचेल तर शनिवार, 28 मे रोजी बीड येथे मुक्काम, रविवार, 29 मे ारेजी स्वस्थानी पंढरपूर येथे पालखी सोहळ्याची सांगता होईल. अशा स्वरूपात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरतर्फे पालखी सोहळ्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे.

श्री पांडुरंगराय व संतांच्या भेटी
श्री पांडुरंगराय पादुका सोहळा मंगळवार, 24 मे रोजी दुपारी जामनेर, जि.जळगाव येथे पोहोचेल. येथे श्री पांडुरंगराय व श्री क्षेत्र पंढरपूर येथून निघालेल्या संत नामदेव महाराज पादुका भेटीचा सोहळा होईल तर सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचा भेटीचा सोहळा होईल. संत मुक्ताबाई महाराजांचा हा 725 वा अंतर्धान सोहळा असल्याने कौडण्यपूरहून माता रुक्मिणी, आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज व सासवडहून संत सोपानदेव यांच्या पादुका व विश्वस्थ मंडळ सोहळ्यासाठी उपस्थित राहतील, अशी माहिती श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.