मुक्ताईनगर- श्रींच्या विसर्जनानंतर परतणार्या विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात होवून ट्रॉली उलटल्याने जी.जी.खडसे महाविद्यालयातील आठ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनल वाजता घडली. पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करून परतलेले ट्रॅक्टर महाविद्यालयाच्या आवारात उलटले. या अपघातात लोकेश पुंजाजी महाजन, आदेश ओमप्रकाश नेमाडे, नीरज अवतारे, आदर्श बिराडे, चेतन युवराज चिमकर, निकेश सुनील कोथळकर, हर्ष कोळी, स्वप्नील नारखेडे जखमी झाले. यापैकी नीरज अवतारे, लोकेश महाजन व स्वप्नील नारखेडे यांना जळगाव येथे दाखल करण्यात आले. खडसे महाविद्यालयातील पाच दिवसीय गणरायाची विसर्जन मिरवणूक महाविद्यालयापासून काढण्यात आली तर मिरवणुकीनंतर ट्रॅक्टरद्वारे पूर्णा नदी खामखेडा पुलावर श्रींचे विसर्जन करण्यात आली व परतीच्या प्रवासात भरधाव ट्रॅक्टर वळवताना ट्रॅक्टरची ट्रॉली महाविद्यालयाजवळच उलटली आणि हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने डॉ.एन.जी.मराठे यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.