17 रोजी दुपारी बारा वाजता होणार मुक्ताई शरणम् जप
मुक्ताईनगर : श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या तिरोभूत (गुप्त) होण्यास यंदा 723 वर्ष पूर्ण होत असून दरवर्षीप्रमाणे यंदा श्री क्षेत्र मेहुण येथे संत मुक्ताई गुप्तदिन सोहळा होणार नाही त्याऐवजी वैशाख वद्य दशमी, रविवार, 17 मे 2020 रोजी दुपारी 12 वाजता सर्व भाविक भक्तांनी आपापल्या घरी मुक्ताई शरणम् जप करावा, असे आवाहन श्रीसंत मुक्ताई देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
संत मुक्ताई गुप्तदिन सोहळा रद्द
खान्देशचे वैभव असणारी श्री संत ज्ञानेश्वरादी भावंडांची बहिण संत आदिशक्ती मुक्ताई शके 1219 मध्ये तापीतीर येथे गुप्त झाल्या. संत मुक्ताई यांचा हा गुप्तदिन सोहळा श्री क्षेत्र मेहुण येथील संत मुक्ताई देवस्थान येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येतो. परंतु यंदा जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संचारबंदी लागू केली असल्याने आणि भाविकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून श्री संत मुक्ताई गुप्तदिन सोहळा रद्द करण्यात आला आहे मात्र भाविक भक्तांनी वैशाख वद्य दशमी रविवार, 17 मे 2020 रोजी दुपारी 12 वाजता आपापल्या घरी मुक्ताई शरणम् चा गजर करून मुक्ताई यांच्या प्रतिमेवर फुले उधळावी आणि मुक्ताई आरती म्हणून गुप्तदिन सोहळा आपापल्या घरी साजरा करावा, असे आवाहन श्री संत मुक्ताई देवस्थान श्री क्षेत्र मेहूण तापीतीर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.