आषाढी वारी पूर्ण झाल्याने वारकर्यांमध्ये समाधान : तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाची आज सांगता
मुक्ताईनगर- कामिका भागवत एकादशीनिमित्ताने परतीच्या वारीला श्री संत मुक्ताई दर्शनासाठी भाविकांचा मळा फुलला तर पायी दिंड्या लक्षवेधी ठरल्या. यंदा श्री क्षेत्र कोथळी येथे दर्शन बारीत भाविक रांगेत उभे होते तर ही दर्शन बारी मुक्ताई मंदिरापासून थेट चांगदेव रस्त्यापर्यंत लागली होती हा प्रसंग आतापर्यंतच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेचा बुधवारी उच्चांक मोडणारा ठरला.
पहाटेपासून लागल्या मुक्ताई दर्शनासाठी रांगा
आषाढी एकादशीला पांडुरंग प्ररमात्म्याच्या दर्शनानंतर संत दर्शन झाल्या शिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, अशी वारकर्यांची अढळ श्रद्धा आहे. या निमित्ताने दरवर्षी आषाढीसाठी पंढरपूर जाणारे भाविक विठ्ठल दर्शनानंतर येणार्या परतीच्या एकादशीला परीसरातील संतांच्या दर्शनानंतर आषाढी वारी पूर्ण झाल्याचा आनंद मिळवतात. परतीच्या एकादशीला वारकरी संत शिरोमणी संत मुक्ताई दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक येथे दाखल होतात. यंदा दशमीलाच मोठ्या संख्येने भाविकांची येथे गर्दी झाली मुक्कामी असलेल्या वारकर्यांनी पहाटे काकड आरती पासून दर्शनासाठी गर्दी केली. दर्शनासाठी लागलेली रांग अगदी मुक्ताई मंदिरा पासून थेट चांगदे रस्त्यापर्यंत पोहोचली होती.
परतीच्या वारीत मुक्ताई भक्तांची मांदियाळी
आषाढी वारीला जाऊन आलेले खान्देशातील हजारो भाविकांनी वारी पूर्ण होण्यासाठी आदिशक्ती संत मुक्ताईचे दर्शन घेतले. याच वारीला परतीची वारी असेही संबोधले जाते. श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन आलेले वारकरी आणि नियमित मेहुण तापी तीर वारीचे वारकरी असा दुहेरी संगम झाल्याने आषाढ वद्य द्वादशी परतीच्या पर्वावर हजारो मुक्ताई भक्तांची मांदियाळी श्री क्षेत्र मेण तापीतीर येथे जमली होती. पहाटे संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या मूर्तीचा अभिषेक, पूजाअर्चा व महाआरती झाल्यानंतर अगदी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. ही रांग सायंकाळपर्यंत कायम होती. सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान सुरेश महाराज तळवेलकर यांचे कीर्तन झाले. हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला.
सत्कार्य व सुसंस्कार घडविणारा असतो निष्ठावान वारकरी -हभप चैतन्य कबीर
वारकरी संप्रदाय हा सर्वात पुरातन व सर्वदूर पसरलेला संप्रदाय असून त्यातून आतापर्यंत अनेक ज्ञानी व्यक्ती घडलेले आहेत. समाजात सातत्याने सत्कार्य करून सुसंस्कार घडविण्याचे काम निष्ठावंत वारकरी करत असतो. अशाच प्रकारचे काम श्री यज्ञेश्वर आश्रमाचे हभप शारंगधर महाराज मेहूणकर हे गेल्या 50 वर्षांपासून करत असल्याचे प्रतिपादन आळंदी देवाची येथील श्री संत कबीर महाराज मठाचे अध्यक्ष हभप चैतन्य महाराज कबीर यांनी येथे केले. मेहुण-चिंचोल येथील श्री यज्ञेश्वर आश्रमात आयोजित तीनदिवसीय कीर्तन महोत्सवाच्या दुसर्या दिवशी आयोजित सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप संजय महाराज देहूकर, माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे, देवनाथ महाराज अंतुर्लीकर, अॅड, रवींद्र भैय्यासाहेब पाटील, माजी आमदार अरूण पाटील, आमदार चैनसुख संचेती, माजी राज्यमंत्री आमदार गुलाबराव गावंडे यांच्यासह महाराज मंडळी व मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. हभप शारंगधर महाराज यांनी गेल्या पन्नास वर्षात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या पासष्टीनिमित्त त्यांची लाडूतुला करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आमदार खडसे यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या शताब्दी महोत्सव साजरा करू असे सांगितले. आमदार खडसे, हभप संजय महाराज व मान्यवरांनी शारंगधर महाराजांना चांदीची संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. हभप शारंगधर महाराज यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या जीवनाचा आढावा घेत वारकर्यांची सेवा हाच जीवनाचा उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मनोज पाटील व शिल्पा नातू यांनी तर आभार शिरीष महाराज वाघाडी यांनी मानले. यशस्वीतेसाठी पासष्टी सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
व्यासपीठावर अवतरली मुक्ताई
हभप शारंगधर महाराज यांचा सत्कार झाल्यानंतर मान्यवरांची मनोगते झाली. अध्यक्षीय मनोगतासाठी हभप चैतन्य महाराज कबीर उठल्याने त्यांची खुर्ची रिकामी झाली. त्या खुर्चीच्या शेजारी आमदार एकनाथराव खडसे बसले होते. याचवेळी उपस्थितांमध्ये एक बालिका बसलेली आमदार खडसे यांना दिसली असता त्यांनी तिला प्रेमाने बोलावून त्या खुर्चीवर बसवले व कुरवाळले. संपूर्ण अध्यक्ष मनोगत होईपर्यंत ती बालिका त्या खुर्चीवर बसलेली होती. कार्यक्रमाला प्रत्यक्ष ‘मुक्ताई’ अवतरली अशी चर्चा यावेळी उपस्थित भाविकांमध्ये रंगली.
आज काल्याच्या कीर्तनाने समारोप
तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाची सांगता गुरूवार, 9 रोजी सकाळी नऊ वाजता हभप चैतन्य महाराज देहूकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.