श्रेयवादात अडकली पालिकेची शिष्यवृत्ती

0

पुणे । महापालिकेकडून दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती (शैक्षणिक अर्थसहाय्य) यंदा प्रथमच नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे. यावर्षी शिष्यवृत्ती थेट मुलांच्या बँक खात्यात जमा होणार असून त्यासाठी सर्व प्रक्रीया पूर्ण झाली आहे. परंतु महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आपण घोषणा केल्याशिवाय एक रुपयाही मुलांच्या खात्यात जमा करू नयेत, अशा सूचना समाज विकास विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे पैसे तयार असतानाही ते मुलांच्या खात्यात भरण्यास प्रशासनाकडून विलंब केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही शिष्यवृत्ती पुणेकरांच्या पैशातून दिली जाते की, पदाधिकार्‍यांच्या खात्यातून असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या योजनेचे श्रेय घेण्यासाठी भाजपने शिष्यवृत्ती थांबविल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अंदाजपत्रकात 21 कोटींची तरतूद
प्रशासनाने यावर्षीपासून ही रक्कम धनादेशाद्वारे न देता थेट मुलांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुलांकडून अर्ज घेतानाच, त्यांच्या बँक खात्यांची माहिती संकलीत करण्यात आली होती. त्यानुसार, मुलांचे अर्ज आणि बँक खात्यांची केवायसी तपासून ही रक्कम जमा करण्यासाठीची सर्व प्रक्रीया पूर्ण झाली आहे. केवळ एक आरटीजीएस फॉर्म भरून अवघ्या काही तासात ही रक्कम मुलांच्या बँक खात्यात जमा करता येणे शक्य आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात 21 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र पाठ थोपटून घेण्यासाठी भाजपने ही शिष्यवृत्ती अडवून ठेवल्याचे बोलले जात आहे.

महापालिका हद्दीतील दहावी आणि बारावी मध्ये चांगले गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना दरवर्षी समाज विकास विभागाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. दहावीसाठी भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद योजनेअंतर्गत शैक्षणिक अर्थसाह्य योजनेखाली 15 हजार रूपये तर 12 वीसाठी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे योजनेखाली 25 हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी यावर्षी सुमारे 10 हजार अर्ज आले आहेत.

पुढील आठवड्यात शिष्यवृत्ती?
महापालिकेच्या ज्या पदाधिकार्‍यांनी ही शिष्यवृत्ती थांबविली आहे. त्यांनी प्रशासनास तूर्तास सोमवारपर्यंत कोणाच्याही खात्यात रक्कम जमा न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, यातील काही मुलांचे धनादेश काढून देण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे. मात्र, आता थेट बँकेतच रक्कम जमा होणार असल्याने धनादेश कसे काढणार याबबत प्रशासन संभ्रमात आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी काही प्रतिनिधीक मुलांना शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र दिले जाण्याची शक्यता आहे. ही शिष्यवृत्ती सोमवारनंतरच जमा होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

तीन महिन्यात प्रक्रीया पूर्ण
महापालिकेने ही शिष्यवृत्ती सुरू केल्यानंतर दरवर्षी त्यासाठीचे अर्ज मागविणे, त्यांची तपासणी, त्यानुसार धनादेश तयार करणे यासर्व बाबींसाठी जानेवारी ते फेब्रुवारी महिना उजाडत होता. 2016 ची शिष्यवृत्ती तर मे 2017 मध्ये वाटण्यात आली. त्यामुळे ही दिरंगाई तसेच प्रशासनाचे कामकाज सुलभ करण्यासाठी या वर्षीपासून महापालिकेने शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालिकेस केवळ अर्ज तपासणीच करावी लागली. या वर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी प्रशासनाने जुलै महिन्यात अर्ज मागविले होते. तसेच अर्जांसाठी सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर अर्ज मिळाल्यावर अवघ्या तीन महिन्यात सर्व प्रक्रीया पूर्ण करण्यात प्रशासनास यश आले आहे.