श्रेष्ठा, रूपा, अमिता..!

0

पोलीस खाते असो की, एखादी मल्टिनॅशनल कंपनी. महिला मोठ्या आत्मविश्‍वासाने काम करत आहेत. ही काही कालपरवा आलेल्या मोदी सरकारच्या जादूची करामत नाही. उलट मोदी सरकार आल्यापासून अशा मोठ्या हुद्द्यांवर काम करणार्‍या महिलांचे खच्चीकरणच होत आहे. हे नेतृत्व पुन्हा महिलांना डोक्यावर पदर घेऊन चुलीपुढे बसवणार की काय, असेच वाटत आहे. उत्तर प्रदेशातील पोलिस अधिकारी श्रेष्ठा ठाकूर हे त्याचे ठळक उदाहरण. मध्य प्रदेशातील तहसीलदार अमिता सिंह तोमर आणि कर्नाटकातील कारागृह महानिरीक्षक रूपा; यांना आपले कर्तव्य बजावताना आलेले अनुभव पाहता महिलांना आता बुरे दिन आल्यासारखेच वाटते. केवळ महिला आधिकारी आहेत, त्यांनी कायदा आणि नियम आपल्याला शिकवू नये, या भावनेतून पुरुषी अहंकार दुखावला गेल्याने त्यांना गुपचूप धडा शिकवण्यात आला आहे.

त्यांची बदली घरापासून खूप लांब करून काही लोकांनी सूड उगवला. यापैकी काही प्रकरणे तर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली. काँग्रेसच्या राज्यातही असे प्रकार घडत असतील; पण आता या सरकारकडून लोकांना ही अपेक्षा नाही. मोदी सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही ते समजले असणार हे निश्‍चित. पण, कुणीही त्याची दखल घेतली नाही. अशावेळी राष्ट्रीय महिला आयोगाने तरी या महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे होते. शासकीय अधिकारी आहेत म्हणून या महिलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उत्तर प्रदेशात श्रेष्ठा ठाकूर या विभागीय पोलीस अधीक्षिकेने कर्तव्य बजावताना आड येणारे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना वठणीवर आणले. शिवाय, त्यांना कायदा काय असतो हेही दाखवले. या महिला अधिकार्‍याकडून नेते आणि कार्यकर्ते दुखावले गेले. त्यांची नाचक्की झाली, असा कांगावा करत भाजप वरिष्ठांनी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी श्रेष्ठा ठाकूर या महिला पोलिस अधिकार्‍याची बहराईच येथे बदली केली. यामुळे श्रेष्ठा ठाकूर खचून गेलेल्या नाहीत हे विशेष. दुसरी घटना आहे तामीळनाडूतील. या दक्षिणी राज्यात भाजप सरकार नसले तरी केंद्र काही महत्त्वाच्या प्रकरणात नक्कीच हस्तक्षेप करू शकते. येथील बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात एआयएडीएमके पक्षाच्या प्रमुख शशिकला यांच्यासाठी कारागृहात दोन कोटी रूपये खर्च करून वेगळा भटारखाना तयार करण्यात आला. शशिकलांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी तेथील राज्य सरकारने ही काळजी घेतली. कारागृहाच्या डीआयजी रूपा यांनी यासंबंधीचा अहवाल डीजीपी कारागृह यांना पाठवला आणि शशिकला यांची पोलखोल केली. पण, झाले उलटेच! डीजीपीसुद्धा शशिकलाप्रेमी निघाले. तेसुध्दा या सर्वप्रकरणात सहभागी आहेत. कारागृहाचा कायदा हवा तसा वाकवून त्यांनीच शशिकला बाईंसाठी ही सुविधा देऊ केली होती. आता हे प्रकरण उघडकीस आणणार्‍या अधिकारी रूपा याच अडचणीत आल्या. रूपयांची बदली करून त्यांचे तोंड बंद करण्यात आले. तिसरी घटना मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील. तेथील तहसीलदार अमिता सिंह यांनाही कर्तव्याशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांनाही असाच वाईट अनुभव आला. अमिता यांची 13 वर्षात 25 वेळा बदली झाली. पंचविसावी बदली झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करून सहकार्य करण्याची विनंती केली; पण काहीही उपयोग झाला नाही. अशाप्रकारे महिला अधिकार्‍यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात घडू लागलेत. सोशल मीडियामुळे त्याची वाच्यता मोठ्याप्रमाणात होत असली तरी अशी अनेक प्रकरणे असतील जी उजेडात येत नसावीत. काहीही झाले की, काँगे्रसच्या राज्यात असे घडत नव्हते का? किंवा काँग्रेसच्या राज्यात असे प्रकार जास्त घडत होते, अशी लंगडी बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी आता आपली विचारधारा नक्की कोणती आहे, हे दाखवण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात आदित्यनाथ योगी यांनी मोठा गाजावाजा करत महिला संरक्षणासाठी मोहिम उघडली. पण, त्यांच्या उत्तरप्रदेशातच श्रेष्ठा ठाकूरसारख्या महिला अधिकार्‍याची बदली करून बदला घेतला गेला. योगी आदित्यनाथांना हे ठाऊकच नाही, असे होऊ शकत नाही. केवळ स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी जर योगी आदित्यनाथ यांनी डोळे बंद केले असतील तर योगींनी केवळ प्रसिद्धीसाठी वेगळा मुखवटा धारण केला असावा, असेच वाटते. यामुळे श्रेष्ठा, रूपा आणि अमिता यांच्यानंतर आणखी एखाद्या महिला अधिकार्‍यांचाही क्रमांक लागू शकतो.

कुणी काय खायचे, आणि काय प्यायचे? याची सक्ती आता काही मूठभर लोक अन्य लोकांवर करू लागलेत. महिलांबाबतही या लोकांची काही धोरणे तयार होऊ लागलीत की काय, अशी दाट शंका येते. सध्या कुटुंब प्रबोधनाच्या नावाखाली वेगवेगळे फतवेही निघालेत. सणासुदीला महिलांनी साडीच परिधान करावी, पुरुषांनी कुर्ता-पायजमाच घालावा. केक कापून वाढदिवस साजरा करू नये, कौटुंबिक गप्पांमध्ये राजकारण, क्रिकेट, आणि चित्रपटासारखे विषय वर्ज्य करावेत, असे हे कुटुंब प्रबोधन आहे. सध्या हे प्रबोधनाच्या स्वरूपात असले तरी भविष्यात त्याची सक्तीदेखील होऊ शकते. या सक्तीमध्ये महिला अग्रभागी असू शकतात!