पुणे । ऑनलाइन खरेदी-विक्री करणार्या क्विकर वेबसाइटवरून विविध प्रजातीच्या कुत्र्यांची विक्री करणार्या जाहिराती अपलोड करून नागरिकांकडून पैसे उकळणार्या तरुणास पुणे सायबरसेल कडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोबाइल, एक लॅपटॉप, एक डोंगल, पाच सिमकार्ड आणि दोन डेबिटकार्ड जप्त करण्यात आले. राजन जनार्दन शर्मा (रा. औंध, मूळ रा. पश्चिम बंगाल ) असे या तरुणाचे नाव आहे.
शर्मा हा क्विकर वेबसाईटवर विविध प्रजातीच्या कुत्र्यांची विक्री करणार्या जाहिराती अपलोड करीत असे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला की त्या व्यक्तीला ऑनलाईन पैसे जमा करण्यास सांगून कुत्रा पार्सल द्वारे घरी पाठविण्यात येईल असे सांगायचा. मात्र कुत्रा न देता फसवणूक करीत असे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादीने पुणे सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधीत जाहिरात कंपन्यांकडे चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यानंतर आरोपीने कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ या राज्यातही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. अशाच प्रकारचे गुन्हे हे हिंजवडी आणि येरवडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कारवाई पोलीस उपयुक पंकज डहाणे, सायबरसेलचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, पोलीस कर्मचारी दीपक भोसले, किरण अब्दागिरे, आदेश चलवादी यांच्या पथकाने केली.