स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत दलितांच्या प्रश्नांची, व्यथांची मांडणी त्या-त्या काळातील धुरीणांंनी केलेली आहे. सिनेमाच्या सुरुवातीच्या काळातील ‘अछूत कन्या’, ‘दो बिघा जमीन’पासून आरक्षण, सैराटपर्यंत हा प्रवास सुरु आहे. देशात जातीयता आहे तापर्यंत या प्रश्नांवर सिनेमे येतच राहतील. समांतर सिनेमांमधून दलितांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणे हे आधुनिक सिनेमा व बदलल्या भारतीय मानसिकतेचे द्योतक मानायला हरकत नाही. समांतर सिनेमांमधून ते समोर येणे अपिेक्षत होते. मात्र, व्यावसायिक सिनेमामधूनदेखील त्याचे दाखले, संदर्भ येत आहेत हे निश्चितच आश्चर्यकारक व स्वागतार्हही आहे. ‘कबाली’ सिनेमातून दिग्दर्शकाने प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष भारतीयांच्या जातीयतेच्या मानसिकतेचे व त्याला पुरुन उरणार्या लढवय्या वृत्तीची झलक दाखविली. या सिनेमात स्वतःला पुढारलेल्या समजणार्या भारतीयांची जातीपातीची संकुचित मानसिकता एका संवादातून उत्कृष्टपणे मांडण्यात आली आहे.
एका संवादात नायक रजनीकांत म्हणतो की “भारतीय लोक जगाच्या पाठीवर जेथे ही गेलेत तेथे जात घेवून गेलेत आणि तेथे जाऊनही त्यांची संकुचित मानसिकता बदलली नाही.” अतिशय मार्मिकपणे दिग्दर्शक व लेखकाने या संवादातून स्वतःला पुढारलेला समजणार्या पांढरपेशांची संकुचित मानसिकता समोर आणली आहे. याच सिनेमात एक संवाद आहे की, गांधीजी धोती घालून साध्या राहणीचे दर्शन घडवायचे तर डॉ. आंबेडकर राजबिंड्यासारखे सुटाबुटात राहायचे; कारण माझ्या समाजानेही याच पध्दतीने अनुकरण करुन प्रत्येकाने नीटनेटके राहीले पाहिजे, असा संदेश ते या वागण्यातून देत असत . सुटाबुटात राहणे हादेखील निषेध करण्याचा मार्ग आहे अशा प्रकारचा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. ‘आरक्षण’ सिनेमातून तर आरक्षणाच्या मुद्दयाला दिग्दर्शक प्रकाश झा यांनी हात घातलेला आहे. या सिनेमात एका प्रसंगात दलित नायक दीपककुमार नोकरीसाठी मुलाखतीला जातो तेव्हा त्या शैक्षणिक संस्थेत नायकाला त्याची पार्श्वभूमी विचारली जाते. दीपककुमार प्रामाणिकपणे सांगतो की माझी आई धुणीभांडी करायची, मेहनत करुन मी शिकलो आहे त्यावर मुलाखातकार त्याला सांगतात की, ही संस्था मुलांना पॉलीश करुन जगाच्या स्पर्धेत त्यांना नेऊन सोडणारी आहे. तुमची व तुमच्या आईची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता तुम्ही या पदाला योग्य नाहीत, असे आम्हांस वाटते. त्यावर नायक म्हणतो, की माझ्या आईची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची तुमची पात्रता नाही.
माझ्या विषयांशी संबंधित एक प्रश्न जरी तुम्ही विचारला असता तर तुम्हा लोकांना हे कळून चुकले असते की योग्यता कुठल्याही पार्श्वभूमीची मोहताज नसते. परंतु तुम्ही लोक माझ्यासारखांना संधी देत नाहीत, घाबरतात. कारण तुम्हाला माहिती आहे की एक संधी मिळाली होती तेव्हा आमच्यातीलच एकाने या देशाचे संविधान लिहून काढले. प्रत्यक्ष व्यवहारातली अस्पृश्यता नसली तरी मानसिक जातीयता टिकून असल्याचे या दृश्यातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. नागराज मंजुळे हा तर भयंकर विस्फोटी रसायन असलेला दिग्दर्शक आहे. संकूचित मनोवृत्तीच्या कानाखाली हळूवार आवाज काढण्यात त्याचा हातखंडा आहे. फॅन्ड्री व सैराटमधून त्याने याची प्रचिती आणून दिलेलीच आहे. नागराजने सैराटमधून ऑनरकिलींगला हात घालून जातीपातीने ग्रासलेल्यांचा नागडेपणा उघड केला आहे. फॅन्ड्रीमधूनदेखील जातीयतेचे विदारक चित्र त्याने मांडले आहे. नागराज स्वतः दलित वर्गातला असल्याने जातीयतेचे चटके त्याने सोसलेले आहेत
– किशोर सुर्यवंशी
9922100500