संक्रांतीच्या वाण खरेदीसाठी गर्दी

0

पुणे । तीळ गुळ घ्या गोड बोला म्हणत नात्याचा गोडवा वाढवत नात्यांची वीण घट्ट बांधणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. एक दिवसावर येऊन ठेपलेल्या या सणासाठी लागणार्‍या साहित्याच्या खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली आहे. विशेषत: वाणाचे साहित्य, साड्या, बांगड्या, हळदी-कुंकू, बोळके, तीळ, गुळ, बोरे, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणसे, हरबरा व तिळाचा हलवा खरेदीसाठी महिलांनी शुक्रवारी बाजारात गर्दी केली होती. गर्दीने बाजार फुलून गेला आहे.संक्रांतीनिमित्त एकमेकीच्या घरी जावून वाण देण्याची प्रथा आहे. या भेटी दरम्यान महिला एकमेकींना भेट स्वरुपात वस्तू देत असतात. त्यात सौंदर्य प्रसाधने, घरगुती उपयोगाच्या वस्तू, पुस्तके, धार्मिक पुस्तके वाणात भेट दिली जातात. या भेट वस्तू सगळ्यांपेक्षा वेगळ्या असाव्यात, असा महिलांचा उद्देश असतो. त्यासाठी विविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. तीळ-गुळ या वस्तूंना संक्रातीस अनन्यसाधारण महत्त्व असते. याला शास्त्रीय कारणेही आहेत. यात तीळ म्हणजे तेल निर्माण करणारा पदार्थ असून हिवाळ्यात तीळ आरोग्यवर्धक असतो.

तिळ महागले
तयार हलवा, रंगीबेरंगी हलवा, तिळाचे लाडू, तिळवडी, तिळपापडी बाजारात उपलब्ध आहेत. सक्रांतीनिमित्त तिळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनामध्ये घट झाली असून प्रतिकिलोस 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे़ त्यामुळे तिळाचे भाव वाढले कपड्यांच्या मार्केटमध्येही महिलांची गर्दी वाढली आहे. विविध प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल, दागिने आणि सौभाग्याचे अलंकार खरेदीसाठी मोठी गर्दी बाजारात दिसून येत आहे.

मार्केटयार्डात वाहतूक कोंडी
संक्रांतीच्या खरेदीसाठी नागरिकांनी मार्केटयार्डात गर्दी केली होती. प्रशासनाच्या अपुर्‍या नियोजनामुळे मार्केटयाडार्तील फळे व भाजीपाला, भुसार विभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतूक होती. त्यामुळे ग्राहकांसह व्यापारी व इतर बाजार घटक हैराण झाले होते.

पतंगांच्या खरेदीसाठी गर्दी
मकरसंक्रांतील पतंग उडविण्याचा आनंद लुटला जातो. बाजारात नवनवीन, आकर्षक पतंग दाखल झाल्या आहेत. त्या खरेदी करण्यासाठी बालचमुंची गर्दी होऊ लागली आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे पतंग देखील उपलब्ध आहते. चिमुकल्यांमधून छोटा भिमचाफोटो असणार्‍या पतंगास मागणी वाढू लागली आहे.