रिंगण चित्रपटातील देव पहिला…विठ्ठला विठ्ठला आणि ’टिंग्या’ तील माझं आभाळ तुला घे तुझं आभाळ मला, आठवाच्या पारुंबीला बांधू एक झुला या प्रकाश होळकरांच्या कवितेच्या ओळी ज्याने आपल्या अवीट चालीने जिवंत केल्या.प्रयत्न आणि प्रयत्न त्यासोबत आवड असणे आणि त्याकरिता झोकून देण्याची वृत्ती यामुळे मोठी व्यक्ती मोठी होत जाते.. आणि कामातून त्याची पोच पावती समाजापर्यंत पोहचते. असा परभणीचा …मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा.परंपरागत आलेला कलेचा वारसा त्यातल्या कलाकाराला स्वस्थ बसू देत नव्हता.वैद्यकीय शिक्षणास नंबर लागला आणि प्रथम वर्षाला असताना त्याने घरात सांगितले.
मला एमबीबीएस करायचे नाही,घरात वडिलांनी तुझे ते तुणतुणे कितीला येते सांग म्हणत चेक हातात दिला.त्याच्यातील कलावंताने मार्ग धरला तो संगीताच्या क्षेत्राचा.पुण्यात समीर नखाते आणि दिग्जांच्या तालमीत त्याच्यातील संगीताबद्दलची अभिरुची व संगीताच्या आराधनेनंतर टिंग्या’च्या संगीत दिग्दर्शनाने पोहचला तो थेट ऑस्करच्या वारीत आणि आता नुकताच मकरंद मानेच्या रिंगण या चित्रपटाने राष्टीय पुरस्कार मिळवला आणि पुन्हा त्याने आपले संगीताबद्दल असलेली आवड आणि प्रेम पुन्हा सिद्ध केले आहे.तो परभणीचा रोहित सूर्यभान नागभिडे या नव्या दमाच्या युवा कलावंताचा हा प्रवास त्याच्याकडून जाणून घेतला डॉ.अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयातील सेंटर फोर मास मिडिया आणि फोरेन लग्वेजेस तर्फे आयोजित एक सुरेल प्रवास कार्यकमात त्याने आपला जीवनपट अवीट संगीत साक्षीने उलगडून दाखवला. पाश्चिमात्य धाटणीचा लुक आणि केसांची सोनेरी लट,उंचपुरा आणि बोली भाषेत असणारा मातीचा आपलेपणा असा रोहित संगीत करताना सरोद,एकतारी,अथवा पारंपारिक संगीताचा बाज सांभाळत गीत सजवतो.त्यातल्या त्यात लोकसंगीताची पेरण करतो.किशोर,लता या गायकांची गाणी आवडतात व संगीतकार शंकर जयकिशन यांची असलेली सुरेलरचना यांची मोहिनी त्याच्यावर आहे, पण लोकसंगीत आणि घरून असलेला चित्र, संगीताचा वारसा यातून घडत गेला.पण आवडणारी गोष्ट करण्यासाठी घरच्यांनी दिलेली साथ आणि दाखवलेला विश्वास यामुळे इथपर्यंत पोहचलो असे नम्रपणे सांगतो.
– शब्दांकन संदीप केदार