‘संगीत कट्यार’ला रसिकांची दाद

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात संगीत ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. चिंचवड येथील नादब्रह्म परिवाराने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवानिमित्त डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या नाटकाचा एक नवा अनुभव उपस्थित रसिकांनी घेतला. फिरता रंगमंच नसतानाही फ्लॅशबॅकद्वारे काही क्षणात रंगमंचावर बदल करणे हे नाटकाचे वैशिष्ट्य ठरले. नाटकाचा विषय, मांडणी मनाचा वेध घेणारी होती. गायकांनी उत्तम स्वरसाजासह सादर केलेल्या नाट्यपदांनी नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेले.

खाँसाहेब आफताब हुसेन (डॉ. रवींद्र घांगुर्डे), सदाशिव (संजीव मेहेंदळे), झरिना (डॉ. वंदना घांगुर्डे), उमा (अस्मिता चिंचाळकर) या गायक नटासोबच कवी बाकेबिहारी (अनंत कान्हो) यांच्या गद्य संवाद असणार्‍या पात्रांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली. नाटकास विघ्नहरी देव (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), अविनाश लघाटे (व्हायोलिन) यांची साथ मिळाली.