जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाच्या वतीने मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वाती देशमुख आणि रंजना बाभुळके यांनी सुश्राव्य गायनाने रसिकांची मने जिंकली..
विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ कलाकार दुष्यंत जोशी, राजेश पुराणिक, स्वाती देशमुख, रंजना बाभुळके इ.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन आणि दीपप्रज्वालने करण्यात आले. शीतल सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
संगीत सभेची सुरूवात रंजना बाभुळके यांनी रचलेल्या व संगीतबद्ध केलेल्या ‛गुरु ज्ञानाचा सागर’ या गीताने करण्यात आली. ‛धन्य धन्य तो सह्य गुरु’, ‛अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’,‛तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे’ ‛मन लागो रे लागो रे, गुरु चरणी’ भक्तिवाचून, मुक्तीची मज जडली रे व्याधी, अश्या एका पेक्षा एक सरस भक्ती गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
मासिक संगीत सभा हे नवीन कलाकार निर्माण करणारे व्यासपीठ आहे. संगीतोपयोगी असेच उपक्रम विद्यालयाने आयोजित करावे असे विचार दुष्यंत जोशी यांनी प्रकट केले. कार्यक्रमाची सांगता स्वाती देशमुख यांनी गायलेल्या ‘कशी जाऊ वृंदावना’ या गवळण भैरवीने झाली. कार्यक्रमात संवादिनी साथ गणेश देसले तर तबला साथ तुषार पुराणिक यांनी केली. भूषण खैरनार यांनी आभार व्यक्त केले व विजय पाटील यांनी सुत्रसंचालन केले.
आचार्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी, सी.बी.एस.ई. प्राचार्य गणेश पाटील, प्रतिष्ठानच्या लेखा विभाग प्रमुख किर्ती बुर्हाणपूरकर, संगीत विभाग प्रमुख किरण सोहळे यांच्यासह संगीत क्षेत्रातील जाणकार रसिक श्रोते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंग पाळत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व संगीत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.