संघटित नसल्याने आरक्षणापासून वंचित

0

जळगाव। धनगर समाजाची लोकसंख्याक ही महाराष्ट्रात 14 टक्के आहे. गेल्या 25 वर्षापासुन समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरु आहे. मात्र समाज एकत्रीत होत नसल्याने संघटन अभावी आजही धनगर समाज आरक्षणापासून वंचीत असल्याची खंत महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना व अहिल्यादेवी महिला संघ कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 वी जयंती निमित्त आयोजित मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. आरक्षणाबाबतची लढाई लढतांना समाजातील लोकांनी एकत्र येऊन आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. तेव्हाच आरक्षण मिळू शकेल असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार रामहरी रुपनवर यांच्यासह धनगर समाजबांधव मेळाव्यास उपस्थित होते

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाज बांधवाचा सत्कार
धनगर समाजातील समाज बांधवांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव जयंती निमित्त आयोजित मेळाव्यात करण्यात आला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत समाजातील जे समाज बांधव निवडुन आले किंवा पराभुत झाले त्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. सेवा निवृत्त कर्मचारी, पदोन्नती मिळालेल्या तसेच विविध ठिकाणी नियुक्त झालेल्या समाज बांधवांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. सत्कारासाठी उपस्थित नसलेल्यांचा घरपोच सन्मानपत्र पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

स्त्रियांसाठी प्रेरणादायी
अहिल्या देवीचे विचार हे दुरगामी होते. अनेक नियोजनाबाबत त्यांच्याकडे दुरदृष्टी होती. आजच्या स्त्रियांसाठी पुण्यश्‍लोक अहिल्या देवी होळकर यांचे विचार प्रेरणादायी आहे. स्त्रियांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी तसेच मॉ साहेब अहिल्या देवींना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. अहिल्या देवीच्या विचाराचे आजच्या देशाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन अलका गोंडे यांनी केले.

यांची होती उपस्थिती
अहिल्या देवी होळकर यांची 292 जयंती या वर्षी साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या जयंती निमित्त शहरातील कांताई सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार रामहरी रुपनवार, डॉ.राधेशाम चौधरी, जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.

कृती आराखडा तयार
घटनेनंतरही 61 वर्षापासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. हे आरक्षण मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाने आंदोलनाचा कृती आराखडा तयार केला आहे. या मागणीसाठी येत्या अधिवेशनात आमदारांना प्रवेश टाळण्यासह विधानभवनाला घेराव घातला जाणार असुन दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर भव्य धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती धनगर समाजाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री अण्णा डांगे यांनी सांगितले. घटनेतील धनगर ऐवजी धनगड या शब्दातील फरकामुळे 25 वर्षापासून आरक्षणाचा लढा सुरू आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असतानाही या निर्णयावर चालढकल केली जात आहे.

रिपाइंतर्फे महाराणा प्रताप यांना अभिवादन
रिपाइं (अ) महिला आघाडीच्या वतीने रामेश्‍वर कॉलनी भागातील महिला आघाडीच्या वतीने महिला आघाडीच्या संपर्क कार्यालयात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस जळगाव तालुका अध्यक्ष रमाताई ढिवरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी रवि भाई, दिपक पाटील,महेंद्र मराठे, मनोज कोळी, संजय खजुरे, बापू सोनवणे, खंडू महाले, सुरेखा बेडसे, हर्षाली देवरे, सोनल याहिदे, लता वाघ, शोभा खैरनार, रुपाली भोई, गोदाबाई राठोड, रेखा जाधव, ललिता पाटील, प्रियंका भावसार, अनिता पाटील, निलिमा वरणकर, पुजा कोळी यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.