खान्देश नाट्य महोत्सव ; नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ – कुटुंबातील प्रत्येकाची लढण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या भोवताली असलेला जनक नावाचा राक्षस आपल्याला कसा नामोहरम करतो हे अप्रतिम सादरीकरणातून नाट्यरसिकांना जनक या नाटकाद्वारे अनुभवायला मिळाले. त्याचबरोबर दोन चित्रकारांच्या मुलाखतीतून अनुभव ऐकण्यास मिळाले. भुसावळ येथील श्रीकृष्णचंद्र सभागृहात सुरू असलेल्या स्वर्गीय नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती प्रायोगिक खान्देश नाट्य महोत्सवाच्या दुसर्या दिवशी 2 जून रोजी सायंकाळी परिवर्तन साक्षरता चित्रप्रदर्शनात लावण्यात आलेल्या चित्रांचे रेखाटन करणार्या चित्रकार राजू बाविस्कर व विकास मल्हारा यांची मुलाखत विजय जैन यांनी घेतली. त्यानंतर दशमी क्रिएशन मुंबई निर्मित जनक नाटकाचा प्रयोग रंगला. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
संघर्षमय जीवनाचे सादरीकरण
रात्री शार्दूल सराफ लिखीत व दिग्दर्शित जनक नाटकाचा प्रयोग रंगला. संगीत प्रणव बडवे, प्रकाश अमोघ फडके, निर्मिती प्रमुख अपर्णा गोखले, नेपथ्य अजय पुजारे, मंचवस्तू चिन्मयी स्वामी, ऋतुजा गद्रे, मोहित कुंटे यांची होती. कलाकार म्हणून अनिल रसाळ, अनिता दाते, आरती मोरे, आनंद पाटील, अंकुश काणे यांनी भूमिका बजावली. जनक ही एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट आहे. एक दिवस पासष्ट लाख रुपये एवढे भरमसाठ वीज बिल येते. आता ते भरायचे की नाही, या अन्यायाला तोंड कसे द्यायचे या मुद्द्यावरून नाटक सुरू होते. पुढे जाऊन वीज देणारी संस्था आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींची मालक आहे हे त्यांच्या लक्षात येते अगदी चैनीच्या वस्तू, अन्न, पाणी आणि ऑक्सिजन या सगळ्या गोष्टी जनकच्या हातात आहे. त्याविरोधात कुटुंबातील सगळ्याच व्यक्ती जनकशी लढा देतात. हा लढा एका तिरकस विनोदातून दिसत राहतो. ते लढतात, हरतात, जिंकतात याबद्दलचे हे नाटक आहे. कुटुंबातील प्रत्येकाची लढण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या भोवताली असलेला हा जनक नावाचा राक्षस आपल्याला कसा नामोहरम करतो हे नाटक आपल्याला दाखवून देते आणि हे सगळे घडण्याला आपण सगळेच जबाबदार नाही का? असा प्रश्नही प्रेक्षकांना हे नाटक विचारते.
आज दोन बालनाट्य, नाट्य परीचर्चा व चार दिवस प्रेमाचे नाटक
रविवार, 3 जून 2018 रोजी सकाळी दहा वाजता श्रीमती प.क. कोटेचा महाविद्यालय भुसावळ निर्मित व अनिल गोष्टी दिग्दर्शित दगडा शिकव धडा हे बालनाट्य तर सकाळी अकरा वाजता साने गुरुजी विद्यालय अमळनेर निर्मित अमोल, संगीता व अरुण लिखीत आणि संदीप घोरपडे दिग्दर्शित पुस्तक एके पुस्तक हे बालनाट्य सादर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पंचक्रोशीतील खानदेशात नाटक रुजवण्यात नवनाटककारांची जबाबदारी या विषयावर नाट्य परीचर्चा होणार आहे. सूत्रसंचालन योगेश पाटील करणार असून यात विरेंद्र पाटील, नितीन वाघ, अमरसिंह राजपूत, नागसेन पेंढारकर, उदय सपकाळे, किरण अडकमोल, राज गुंगे, वैभव मावळे, गोपीचंद धनगर, संदीप पाचंगे, हर्षल पाटील, होनाजी चव्हाण, हेमंत पाटील हे खानदेशातील नव नाटककार सहभागी होणार आहेत. रात्री आठ वाजता रत्नाकर मतकरी लिखित व महेश डोकफोडे दिग्दर्शित चार दिवस प्रेमाचे हे प्रायोगिक नाटक सादर होणार आहे. रसिक श्रोत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन उत्कर्ष कलाविष्कारतर्फे करण्यात आले आहे.