आज नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर भलेही असतील पण भविष्यातही ते राहतीलच, याची काही शाश्वती नाही. संघाच्या कामाचे निरीक्षण करणार्यांना वाटते की, संघटनेने बलराज माधोकसारख्या प्रखर आणि कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला दुधातल्या माशीसारखे अचानकपणे हटवले. लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मोहम्मद अली जिन्नांची प्रशंसा केली म्हणून वेगळे केले. म्हणून संघ कोणत्याही नेत्याला जोपर्यंत स्वीकारतील तोवर तो राहील.
भारताला ‘काँग्रेसमुक्त’ करणे गरजेचे आहे, कारण गेल्या साठ वर्षांत त्यांनी काहीही केले नाही, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मतदारांच्या मनावर ठसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु, यातून काहीच साध्य होईल असे दिसत नाही. तसा प्रयत्न चालला आहे खरा, पण तो प्रयत्न म्हणजे वेळेचा अपव्यय होय. मोदींच्या या प्रयत्नाला खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुरुंग लावला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी काँग्रेसमुक्त भारता’च्या घोषणेला सार्वजनिकरीत्या फेटाळून लावले. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भागवत म्हणाले, ही केवळ एक राजकीय म्हण आहे. संघ अशी भाषा कधीच बोलत नाही. मुक्त वगैरे शब्द कायम राजकारणात वापरले जातात. आम्ही कोणालाच कोणापासून वेगळे करण्याची भाषा करत नाही. सरसंघचालकांनी आपल्या सगळ्यांत निष्ठावान स्वयंसेवकाच्या काँग्रेस विरोधी अभियानाला सार्वजनिक मंचावरून बाद ठरवले आहे. परंतु मोदी आणि भागवत यांच्यातील सलोख्याचे संबंध संपले, असा याचा अर्थ होत नाही. संघ आणि मोदी यांच्यात आता खडाजंगी होणार, असा निष्कर्ष भागवतांच्या या वक्तव्यातून काढणे योग्य नाही. नरेंद्र मोदी – अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकवाक्यात गेल्या चार वर्षांत एकही पाऊल चुकीचे पडलेले नाही. जेव्हा बोलण्याची गरज पडली तेव्हा भागवतांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला, स्तुती केली आणि टीकाही केली.
मोदींनीही सरकारद्वारे संघाला वेळोवेळी पाठिंबा दिला. त्यांच्या स्वयंसेवकांना महत्त्वपूर्ण पदांवर बसवले, संघाच्या महत्त्वपूर्ण अधिकार्यांना दूरदर्शनवरून प्रसार आणि प्रचार करण्याची संधी तसेच मुभा दिली आणि प्रत्येक मंचावरून संघाच्या विचारांना पुढे नेण्यात मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2014 च्या निवडणुकांआधी संघाला अंदाज होता की, मोदींची वैयक्तिक लोकप्रियता मोठी आहे. म्हणून संघाने मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवले. वाजपेयी यांची सत्ता गेल्यावर संघ दहा वर्षांत अज्ञातवासात होता. म्हणूनच 2002 साली गुजरातमध्ये हिंदुत्ववादी विचार आणि त्यावर आधारित राजकारण बळकट करणार्या नरेंद्र मोदींना 2014 साली संघाने ‘हुकमी पत्ता’ म्हणून बाहेर काढले. मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून संघाने मोदींवर जबाबदारी दिली. संघही चाल खरी ठरली. परंतु भाजपमधील जुने, जाणते नेते या राजकीय बदलावर नाराज झाले. निवडणुकांनंतर जेव्हा मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा संघाच्या धार्मिक अजेंड्याच्या विचारांशी असहमत असलेल्या खुल्या बाजारातल्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ’आता मोदी कोणाचंही चालू देणार नाहीत आणि संघाच्या लोकांना ते त्यांची जागा दाखवून देतील’. पण मोदी आणि भागवतांनी आतापर्यंत हे अंदाज खोटे ठरवले आहेत. संघाचे नेतृत्व संघटनेला राजकारणापलीकडे मानत असते. राजकारण हे त्यांच्यासाठी दुय्यम आहे. आज मोहन भागवतसुद्धा संघाच्या स्वयंसेवकांना हेच समजावत आहेत की, त्यांनी जरी राजकारणात मोठा टप्पा पार केला असला तरी संघटनाच श्रेष्ठ आहे. संघटनेमुळेच तुम्ही राजकारणात एका वेगळ्या उंचीवर गेले आहात आणि तुमच्या राजकारणातल्या यशामुळे संघटना म्हणजे संघाने उंची गाठलेली नाही. संघ स्वत:ला देशाचा रक्षणकर्ता म्हणून पाहत आहे.
देशाला निधर्मी, विदेशी आणि अंतर्गत शत्रूंपासून वाचवण्याची जबाबदारी संघाची आहे, असे स्वयंसेवक मानतात. म्हणून मोहन भागवत म्हणतात की, शत्रूंशी युद्ध करण्याची तयारी करण्यासाठी भारतीय लष्कराला सहा महिने लागतील, पण संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांत तयार होतील. भागवतांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाली. रोजगार निर्माण करण्यात मोदी सरकारला आलेले अपयश, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोट्यामोठ्या उद्योजकांमध्ये असलेला असंतोष, बँक घोटाळे, शेतकर्यांचा वाढता असंतोष, दलितांचा वाढता राग, यामुळे नरेंद्र मोदींच्या प्रतिष्ठेला आता ग्रहण लागले आहे. भाजपविरुद्ध सातत्याने वाढत असलेल्या असंतोषामुळे संघात चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीचा परिणाम राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील होणार्या विधानसभा निवडणुकांवर होईल, अशी भीती संघात व्यक्त होत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींचा सामना करण्यासाठी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तेलंगण राष्ट्र समितीचे सक्रिय होणे संघासाठी चिंतेचा विषय आहे. आज नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर भलेही असतील पण भविष्यातही ते राहतीलच, याची काही शाश्वती नाही. संघाच्या कामाचे निरीक्षण करणार्यांना माहिती आहे की, संघटनेने बलराज माधोकसारख्या प्रखर आणि कट्टर हिंदूत्ववादी नेत्याला दुधातल्या माशीसारखे अचानकपणे हटवले. लालकृष्ण अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मोहम्मद अली जिन्नांची प्रशंसा केली म्हणून वेगळे केले. म्हणून संघ कोणत्याही नेत्याला जोपर्यंत स्वीकारतील तोवर तो राहील, हे स्पष्ट आहे. मोदींची अशीच परिस्थितीही अशीच आहे.
– अशोक सुतार
8600316798