नवी दिल्ली-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ६०० स्वयंसेवकांशी नागपूरमध्ये संवाद साधणार आहेत. ७ जून रोजी हा कार्यक्रम होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. मुखर्जी यांच्या कार्यालयाने याबाबत अद्याप काही सांगितलेले नाही.
६०० स्वयंसेवक सहभागी
भारताच्या माजी राष्ट्रपतींना आम्ही नागपूरमध्ये संघ स्वयंसेवकांशी संवाद साधण्याचे आमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारल्याचे संघाच्या ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून त्यांना मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत. “माजी राष्ट्रपतींनी हे निमंत्रण स्वीकारणे म्हणजे महत्त्वाच्या मुद्यांवर संवाद साधण्याचा देशाला दिलेला संदेश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व यांच्यासंबंधात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांना हे निमंत्रण स्वीकारणे हे उत्तर आहे, असे मत संघाचे नेते राकेश सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.
गेली अनेक दशके काँग्रेसचे नेते असलेले मुखर्जी गेल्या जुलैमध्ये राष्ट्रपती पदावरून पायउतार झाले. इंदिरा गांधीपासून ते राजीव गांधींपर्यंत व नंतर सोनिया गांधींसोबत मुखर्जी यांनी काम केले आहे. मनमोहन सिंग सरकारमध्ये मुखर्जी यांनी अर्थमंत्रीपदही सांभाळले होते. त्यामुळे काँग्रेसचा प्रदीर्घ वारसा असलेले व राष्ट्रपतीपदासारखे सर्वोच्च पद भूषवलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून याबाबत सगळ्यांना औत्स्युक्य आहे.