संघाच्या स्वयंसेवकांना सीमेवर पाठवा!

0

शरद पवारांचा केंद्र सरकारला उपरोधिक सल्ला

पंढरपूर : देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक प्राणांची बाजी लावतात. पण त्यांच्याऐवजी आता केंद्र सरकारने संघाच्या स्वयंसेवकांना हाफ पँट-शर्ट घालून आणि काठी देऊन देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवावे म्हणजे भागवतांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे ते देशाला समजेल, अशी झणझणीत टीका राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केली. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघातच्या शिबिरात मार्गदर्शन करताना भारतीय लष्करापेक्षा संघाचे कार्यकर्ते सरस असल्याचे अप्रत्यक्ष म्हटले होते. या वक्तव्यावर पवारांनी ही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

स्वयंसेवकांची तुलना जवानांशी..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या प्रशिक्षण शिबिरात हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले होते. तर भागवतांनी संघाच्या स्वयंसेवकांची तुलना ही सैनिकांशी नाही देशातल्या जनतेशी केली होती असे स्पष्टीकरण संघाने दिले होते. असे असले तरीही भागवत यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका अजूनही होत आहे. शरद पवारांनीही त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. सीमेवर लढणार्‍या जवानांना प्रशिक्षित करण्यासाठी सहा महिने लागतात. मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात प्रशिक्षित होतात. वेळ पडली तर ते सीमेवरही जायला तयार आहेत असे वक्तव्य भागवतांनी केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत शरद पवार यांनी केंद्र सरकारने सैनिकांऐवजी संघाच्या स्वयंसेवकांनाच सीमेवर पाठवावे असा उपरोधिक सल्ला दिला आहे.