एकनाथराव खडसे ; ‘पुस्तक तुलेवरून’ स्वपक्षीयांवर साधला निशाणा
भुसावळ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विचारधारा असून येथे गाढव घातला तरी त्याचा माणूस होवून तो बाहेर पडतो, असे संस्कार येथे दिले जातात, असे परखड मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर (बापूराव) मांडे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या बाणेदार शैलीत खडसे यांनी फटकेबाजी करीत पुस्तके अनेक घेतली जातात व रद्दीतही विकली जातात, असे सांगून खळबळ उडवून दिली. अर्थात त्यांचा हा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या कार्यकाळात घडलेल्या पंडित दिनदयाल जनशताब्दीनिमित्त आलेली पुस्तके थेट रद्दीत विक्री झाल्याने असल्याने उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.
गिरीश महाजनांचे नाव न घेता उपरोधिक टोला
खडसे यांनी आपल्या भाषणात पक्ष कुणाही एकामुळे वाढत नसल्याचे सांगून सर्वांमुळे तो वाढतो, असे सांगून बापूराव मांडेसारखे ठरावीक लोक कार्यकर्ते घडवतात अन्यथा पाय ओढणार्यांचे प्रमाण राजकारणातही कमी नाही, असे सांगत समोरचा माणूस मोठा व्हायलाच नको, असे लोकही कमी नसल्याचे सांगितले. खडसे-महाजन यांच्यातील सख्य जिल्हावासीयांना ठावूक आहे त्यामुळे खडसे यांनी एका तिरात दोन निशाणे साधल्याने या बाबीची कार्यक्रमानंतर चांगलीच चर्चा रंगली.