मुंबई-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने विविध राजकिय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आगामी काळात पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींऐवजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
११० जागा गमवाव्या लागतील
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे कऱण्याची तयारी करत आहे, असे आम्हाला वाटतेय. आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला ११० जागा गमवाव्या लागतील, असे भाकीतही वर्तवले आहे. संजय राऊत यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली असतानाही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संघाच्या शैक्षणिक पाठ्यक्रमाच्या तृतीय वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कार्यकर्त्यांना मुखर्जींनी संबोधित केलं.