केंद्र सरकारच्या देशातील परदेशी गुंतवणुकीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला संघ परिवारातील स्वदेशी लॉबीने विरोध केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाला अन्य संघटनाही दबक्या आवाजात विरोध करत आहेत. दुसरीकडे संघाच्या अंतर्गत आणि बाह्य वर्तुळात हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी तोगडियांच्या आग्रहामुळे केंद्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाची चिंता वाढली आहे. तोगडियांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा सोडून द्यावा, राममंदिराची उभारणी आणि हिंदुत्वाच्या अन्य मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरू नये, असे संघ नेतृत्वाचे मत आहे.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडियांचे अचानक गायब होणे आणि नंतर रात्री बेशुद्धावस्थेतून शुद्धीत आल्यावर तोगडियांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सगळे काही आलबेल नसून, त्यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. आपले एन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवणार्या तोगडियांनी कोणाचे नाव न घेता, मरणाला घाबरत नसून हिंदुत्वासाठी आवाज उठवणे कायम ठेवणार असल्याचे जाहीर केले. संघ परिवार आपल्याला जाणूनबुजून वेगळे पाडत असल्याची भावना कट्टर हिंदुत्वाची कास धरणार्या या नेत्याच्या मनात तयार झाली होती. केंद्र सरकार चालवण्यासाठी कडव्या हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित करू नये याकरिता त्यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप तोगडियांच्या निकटवर्तीयांनी केला.
विश्व हिंदू परिषदेच्या कडवट कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वयाच्या 10 व्या वर्षांपासून संघाच्या शाखेत जाणारे दीक्षित आणि मागील 40 वर्षांपासून कडव्या हिंदुत्वाचा चेहरा बनलेले प्रवीण तोगडिया हिंदुत्वाची धार बोथट करण्याविरोधात होते. या गोष्टीमुळे मागील काही दिवसांपासून तोगडिया प्रचंड अस्वस्थ झाले होते. विशेष म्हणजे संघाच्या हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या तोगडियांना आता संघाच्या नेतृत्वाकडूनच आडकाठी होत आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या अडचणी वाढ होऊ नये म्हणून तोगडियांनी राममंदिराच्या उभारणीसह हिंदुत्वाच्या संघाच्या अजेंडातील आठ मुद्द्यांचा आग्रह धरू नये, असा संघ नेतृत्वाचा आग्रह आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे संघ परिवारात सध्या अस्वस्थता वाढली असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या काही पदाधिकार्यांनी दिली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा बनवण्याच्या मुद्दयावरुन नाराज आहेत, तर स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघ केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर नाराज आहेत. केंद्र सरकारच्या देशातील परदेशी गुंतवणुकीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला संघ परिवारातील स्वदेशी लॉबीने विरोध केला आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयाला अन्य संघटनाही दबक्या आवाजात विरोध करत आहे. दुसरीकडे संघाच्या अंतर्गत आणि बाह्य वर्तुळात हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी तोगडियांच्या आग्रहामुळे केंद्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्वाची चिंता वाढली आहे. तोगडियांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा सध्या सोडून द्यावा, राममंदिराची उभारणी आणि हिंदुत्वाच्या अन्य मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरू नये, असे संघ नेतृत्वाचे मत आहे.तोगडियांना मात्र संघ नेतृत्वाची ही भूमिका मंजूर नाही. त्यांनी हिंदुत्वासहित आपल्या आठ मुद्द्यांवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येत राम जन्मस्थळी राममंदिर उभारण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची वाट न बघता संसदेत प्रस्ताव मांडून कायदा करणे, देशात गोहत्याबंदीसाठी देशव्यापी कायदा तयार करणे, गोरक्षकांविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, सूचना तत्काळ मागे घेणे. समान नागरिक संहिता लागू करणे, जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द करणे, काश्मीरमधून विस्थापित झालेल्या पंडितांचे काश्मीरमध्येच पुन्हा पुनर्वसन करणे, ज्याप्रमाणे मुस्लीम युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अल्पसंख्याक विकास महामंडळ आहे त्याचधर्तीवर अंदाजे 10 कोटी हिंदू युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी हिंदू विकास महामंडळाची निर्मिती करणे, शेतकर्यांना पीक लागवडीच्या दीडपट किंमत देण्याचे 2014 मध्ये दिलेले वचन पूर्ण करणे आणि महागड्या उपचारांना कंटाळलेल्या जनतेला अल्प दरातील आरोग्य योजना सुरू करणे, असे तोगडियांनी मांडलेले मुद्दे आहेत.
भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात तोगडियांवर पद सोडण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण विश्व हिंदू परिषदेच्या अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी तो प्रयत्न फोल ठरवला. सध्या देशातील 19 राज्ये आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना, ज्या कारणांसाठी संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवारांपासून गोवळकर गुरुजींसह संपूर्ण संघ परिवाराने मागील 90 वर्षांत सतत जे जनमत तयार केले, संघर्ष केला त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आता करणार नाही, तर मग केव्हा करणार, असा प्रश्न विचारण्यास तोगडियांनी सुरुवात केली होती. संघ परिवाराला मात्र हिंदुत्वावर जोर देऊन भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारसमोरील अडचणी वाढवायच्या नाही आहेत. जर आताच्या सरकारने व्यवस्थित कामे केली तर जनता त्यांना पुन्हा निवडून देईल आणि मग हिंदुत्वाचा अजेंडा हळूहळू ठामपणे राबवता येईल, असे संघ नेतृत्वाचा विचार आहे. खरे म्हणजे सत्तास्थानी पोहोचल्यानंतर सर्वच धर्माचा आदर करून त्यांच्याशी सर्वधर्मसमभाव या नात्याने वागावे लागते.
– विशाल मोरे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
9869448117