संजय गांधी योजनेची 356 प्रकरणे मार्गी

0

पिंपरी-चिंचवड : विधवा, परितक्ता तसेच घटस्फोटीत महिलांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेची 356 प्रकरणे एकाच दिवशी शुक्रवारी मार्गी लागली. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत संजय गांधी अनुदानसह राज्यशासनाच्या महसूल विभागाशी निगडीत विविध कल्याणकारी योजनांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

अकराशे नागरिकांनी घेतला लाभ
तहसिलदार गितांजली शिर्के, योजनेच्या तहसिलदार सुनिता अस्वले, परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांच्यासह निगडी, पिंपरी, चिंचवड येथील तलाठी व मंडलाधिकारी आदी अधिकारी वर्ग या शिबिरात दिवसभर सहभागी झाले होते. तलाठी दाखला, गृह अहवाल, उत्पन्न दाखले, रेशनकार्ड संबंधित कामांचा या वेळी जागेवर निपटारा करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते झाले. संजय गांधी योजनेच्या पिंपरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष नितीन घोलप, सदस्य उत्तम कुटे, सारिका तामचीकर, संभाजी सुर्यवंशी, धरम वाघमारे यावेळी उपस्थित होते.दिवसभरात सुमारे 1100 नागरिकांनी या शिबिराला भेट देवून विविध योजनांचे फॉर्म घेतले. लवकरच दापोडी, कासारवाडी, निगडी या भागात ही स्वतंत्र शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चाबुकस्वार यांनी यावेळी दिली.