संजोग वाघेरे यांच्या केवळ आडनावाताच वाघ!

0

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या आडनावातच वाघ आहे. मात्र प्रत्यक्षात ते भिगी बिल्ली आहेत. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला होता. पण मी जनतेच्या दारात जाऊन त्यांचा कौल घेतला. त्यामुळे पळून जाणार्‍या संजोग वाघेरे यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये, असे सडेतोड प्रत्युत्तर महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आपल्यावरील टीकेला दिले आहे.

…वाघेरेंचा म्हणून तिळपापड
याबाबत प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, वाघेरे हे जन्मापासूनच 2017 पर्यंत सत्तेत होते. आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता उपभोगली आहे. इतकी वर्षे सत्ताधारी असलेल्या वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड शहराचे सोडाच मात्र त्यांना त्यांच्या स्वत:च्या वार्डाचा विकास करता आलेला नाही. त्यांचा केवळ आपल्या पुर्वजांच्या स्मारकाचे सुशोभिकरण करण्याचा अट्टाहास असतो. पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नुतनीकरणाचे व सुशोभिकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. परंतु, भाजपने पिंपरी महापालिकेत सत्ता आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या आत पिंपरीगावातील विविध प्रकल्प आणि विकासकामे करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे वाघेरे यांचा तिळपापड होत असून ते भाजपवर असभ्य, बेछूट तसेच खालच्या पातळीवर जात आरोप करीत आहेत.

केवळ मिरवण्याचा सोस
आता ज्या पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, त्याच राष्ट्रवादीने 2012 च्या महापालिका निवडणुकीत संजोग वाघेरे यांना तिकीट नाकारले होते. पक्षविरोधी काम करत अपक्ष म्हणून ते निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे निष्ठावान असल्याचे सांगण्याचा वाघेरे यांना अधिकार नाही. त्यांना पक्षनिष्ठा किंवा शहरवासियांच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नाही. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मिरवण्याचा सोस आहे.

लोकससभा निवडणूकीतून पळ
दरम्यान, वाघेरे यांनी 2014 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र त्यांची तेवढी राजकीय उंची, कार्य आणि प्रतिमा नसल्याचे त्यांना वेळीच उमगले. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. शेवटी राष्ट्रवादीला आयात उमेदवार उभा करावा लागला. पण मी कधीही निवडणुकीच्या मैदानातून पळ काढलेला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करत भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा जास्त मते घेतली आहेत. शहराच्या राजकारणाचा अभ्यास कमी असलेल्या संजोग वाघेरे यांना हे कदाचित माहिती नसेल. त्यामुळे वाघेरे यांनी आपल्या पक्षात स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी वेळ खर्ची घालावा. भाजपला किंवा मला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये, असे पवार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.