संततधार पावसाने तरारली पिके

0

भुसावळ । गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या श्रावणसरींमुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. शहर व परिसरात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात रोज पावसाची हजेरी लागत आहे. काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरवात झाली. तो आजही खंडित स्वरुपात सुरुच होता. सायंकाळपासून तर पावसाने जोर धरल्याने बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत असला, तरी शेती परिसरातील विहीरींसह इतर जलसाठे भरण्यासाठी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. परिसरात गेल्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस झाल्याने पिके डोलू लागली आहेत. परिसरातील गावांत दोन दिवसांपासून श्रावणसरींची अनुभूती येत असून, अधूनमधून संततधार सुरु असल्याने पिकांनी फेर धरला आहे.

शेतीकामांना वेग आल्याने मजुरांना रोजगार
सद्यस्थितीत सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील साकरी, कुर्‍हे पानाचे, वरणगाव, निंभोरा परिसरात पिकांची स्थिती समाधानकारक आहे. यंदा परिसरात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, सध्या निंदणी, खत देणे, कोळपणी आदी कामांमध्ये शेतकरी व्यस्त आहेत. त्यामुळे परिसरातील मजुरांना बर्‍यापैकी रोजगारही उपलब्ध होत आहे. कपाशीव्यतिरिक्त ज्वारी, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचीही वाढ चांगली आहे.

वाहनधारकांची कसरत
गेले तीन दिवस सुरु असलेल्या दमदार पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. रेल्वे तसेच बसस्थानक, खडका रोड, जामनेर रोड, जुना सातारा पुल, हद्दीवाली चाळ परिसरात पाणी साचले. बसस्थानक परिसरात खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने येथून वाहनधारकांना वाहने चालवितांना अतिशय कसरत करावी लागली. त्यामुळे दिवसभर वाहतूकीची कोंडी कायम राहिली. संततधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

डबक्यांमुळे वाहनधारक त्रस्त
रावेर शहरासह परिसरातील पाल, निंभोरा, सावदा परिसरात सकाळपासूनच रिप-रिप पावसाने हजेरी लावली. फैजपूर परिसरात देखील दिवसभर पाऊस बरसला. भुसावळ शहरात संततधार पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून संततधार पावसाने गटारी, नालेसफाई नसल्याने खडका रोडवर पाण्याचे तळे साचले. त्याचा पादचार्‍यांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने लहान- मोठे अपघात देखील होत आहेत.