जळगाव। सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. यात शहर पोलिस ठाण्यात अजीज रशिद पठाण (वय 25, रा.गेंदालालमिल) याला सोमवारी आणण्यात आले. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा संताप आल्यामुळे त्याने पोलिस ठाण्यातच डोके फोडून घेतले. पोलिस कर्मचार्यांनी त्याला रोखून नंतर रूग्णालयात उपचारासाठी नेले होते.
उपचारानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अजीज याच्या विरूद्ध दंगल व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात गोंधळ उडाला होता. अजीजच्या नातेवाईकांनी देखील पोलिस ठाण्यात हजेरी लावत संताप व्यक्त केला. या कारवाई अंतर्गत सोमवारी रविंद्र उर्फ आबा दामु सोनवणे, सुनिल रामा चोरट, ललित अरूण चौधरी, फिरोज नुरमोहम्मद शाह, राजु साबीर खान आणि नईन तुकडू सैय्यद यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर व सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे यांनी ही कारवाई केली.