पिंपरी-चिंचवड : गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात कचर्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगर आणि म्हेत्रेवस्ती या परिसरातील कचरा गेल्या अनेक दिवसांपासून उचलला जात नव्हता. त्यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त झाले होते. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे आणि ग्रामस्थांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी ‘कचरा फेको’ आंदोलन केले.
कार्यकर्ते, सुरक्षारक्षकांबरोबर झटापट
या परिसरातील आणि सोसाट्यांमधील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला जात नाही. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील कचरा उचलण्यास महापालिकेची गाडी येत नाही. गेल्या अनेक दिवसांनतर शुक्रवारी प्रभागात कचर्याची गाडी आली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नगरसेविका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांने थेट कच-याची गाडी घेऊन महापालिकेत आले. गाडीतील कचरा पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकण्यात आला आहे. कचरा टाकताना कार्यकर्ते आणि महापालिकेच्या सुरक्षारक्षकांमध्ये जोरदार झटापट झाली आहे.
कचरा उठाव होत नाही, याबाबत वारंवार प्रशासाकडे पाठपुरावा केला. परंतु, प्रशासन जाणीपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रशासनाला या गंभीर प्रश्नांची जाणीव व्हावी, यासाठी हे आंदोलन केले.
-पोर्णिमा सोनवणे
गुन्हा दाखल होणार का?
दरम्यान, यापूर्वी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी देखील प्रभागातील कचरा उचला जात नसल्याच्या निषेधार्ध पालिकेसमोर कचरा फेकून आंदोलन केले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने चिखले यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी देखील पालिका प्रशासन गुन्हा दाखल करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.