फैजपूर। संत ज्ञानेश्वर महराजांच्या अलंकापुरीत जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेची शताब्दीपुर्ती महोत्सव 22 ते 29 मार्च या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातील कलाशिक्षकांनी संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, आदिशक्ति मुक्ताई यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे आयोजन करुन माऊलींच्या चरणी आपली सेवा रुजू केली. आजपर्यंत या कलाशिक्षकांनी कलाविष्कार गृपमार्फत हे अध्यात्मिक चित्र प्रदर्शन श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताई, श्रीक्षेत्र शेगाव, श्रीक्षेत्र धोत्रा, विठ्ठल मंदिर न्हावी, नाथ मंदिर सावदा येथील स्वामीनारायण शताब्दी महोत्सव सावदा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बामणोद, जगन्नाथ महाराज अंजाळेकर महोत्सव, सिंहस्थ कुंभमेळा नाशिक, उज्जैन या तीर्थक्षेत्राठिकाणी सादर केले गेले.
आळंदी येथे होणार सादरीकरण
आता हे प्रदर्शन आळंदी देवाची येथील शताब्दी महोत्सवात सादर होत असल्याने आळंदीकर व पुणेकरांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी स्वानंद सुखानिवाशी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र आळंदी येथील अध्यक्ष हभप संदिपन शिंदे महाराज, हभप बाजीराव चंदिले, हभप नरहरी महाराज आळंदीकर, आदिशक्ति मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, हभप रविंद्र हरणे महाराज, हभप उध्दव जुनारे महाराज, सतपंथ संस्थान फैजपूरचे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, नरेंद्र नारखेडे यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. तरी या चित्र प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक कलाशिक्षक व्ही.ओ. चौधरी, वाय.आर. लोधी यांच्यासह सर्व कलाशिक्षकांनी केले आहे.